Welcome 2023 : हॅप्पी न्यू इयर, देशभर जल्लोषात नववर्षाचं स्वागत, उत्साह शिगेला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 1, 2023

Welcome 2023 : हॅप्पी न्यू इयर, देशभर जल्लोषात नववर्षाचं स्वागत, उत्साह शिगेला

https://ift.tt/hOR2BZ3
मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांसह देशभरातील नागरिकांनी सरत्या २०२२ ला निरोप देत २०२३ चं जल्लोषात स्वागत केलं आहे. तब्बल दोन वर्षानंतर करोना संकट कमी झाल्यानं नागरिकांनी उत्साहाच्या वातावरणात नव्या वर्षाचं स्वागत जगभरात केलं. भारतात देखील मोठ्या उत्साहाच्या वातावरणात नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. ठिकठिकाणी नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसून आला. मुंबई, पुणे, बंगळुरु आणि दिल्लीमध्ये नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. मुंबईत मरीन ड्राइव्ह परिसरात मोठ्या प्रमाणावर तरुणाई नववर्षाच्या स्वागताला जमली होती. २०२२ संपून २०२३ ची सुरुवात होताच मुंबईत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मुंबईत अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले. मुंबई पोलीस दलाकडून नववर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमात अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुण्यातही जल्लोषात नववर्षाचं स्वागत ‘करोना’ची मरगळ झटकून ‘निर्बंधमुक्त’ वातावरणात पुणेकरांनी सरत्या वर्षाला निरोप देऊन, नववर्षाचे जल्लोषाचे स्वागत केले. संध्याकाळपासून सुरू झालेल्या उत्सहाला मध्यरात्रीनंतर उधाण आले होते. रात्री बाराच्या ठोक्याला सर्वांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत जल्लोष सुरू केला. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी संध्याकाळपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती. रस्ते, हॅाटेल, चौक, विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आली होती. ‘२०२२ बाय बाय... २०२३... वेलकम’ असे फलक ठिकठिकाणी झळकत होते. पुणे शहर आणि उपनगरांमधील रस्त्यांवर नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून आली. शहरातील रस्त्यांवर रंगेबेरंगी फुगे, लाइट लावण्यात आले होते. फटाक्यांची आतिषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. नववर्षाचे स्वागत करण्यात दर वर्षी तरुणाई आघाडीवर असते. गेल्या दोन वर्षांमध्ये करोनामुळे निर्बंधाच्या सावटाखाली नववर्षाचे स्वागत करण्यात आले होते. यंदा कोणतेही निर्बंध नसल्यामुळे सर्वांमध्ये नववर्षाच्या स्वागतचा उत्साह दिसून आला. देशभरात उत्साहात स्वागत नवी दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये लोक मोठ्या संख्येनं नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जमा झाले होते. गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्यानं दिल्ली पोलिसांना गर्दी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले. उत्तराखंडच्या मसुरीमध्ये रोषणाई, संगीत आणि नृत्याच्या तालावर तरुणाईनं स्वागत केलं. कोच्चीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोचीन कार्निवलमध्ये मोठ्या संख्येन लोक जमा झाले होते. कोच्चीच्या फोर्टमध्ये नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या लोक जमले होते. हिमाचल प्रदेशात विविध ठिकाणी नागरिकांनी स्वागत केलं. मनालीमध्ये लोक आणि पर्यटक मोठ्या संख्येनं जमले होते. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये लोकांनी जल्लोषात स्वागत केलं.