
सातारा : "तुझी आई पोलिसांकडे गेली तर तुझे आणि कुटुंबाचे आयुष्य बरबाद होईल. व्हिडीओमुळे तुम्ही अडचणीत याल. मी तुम्हाला बरबाद करेन," अशी वारंवार धमकी देऊन पीडित अल्पवयीन तरुणीवर दबाव आणून धमकी दिल्याप्रकरणी बाप-लेकावर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील एका महाविद्यालयीन अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका तरुणावर पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच हे प्रकरण दडपण्यासाठी पीडितेलाच धमकी दिल्याचा आरोप केल्याने संशयित तरुणाच्या वडिलांवरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर सातारा शहर पोलिसांनी तातडीने संबंधित संशयित तरुणाला आणि त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.पीडित तरुणी ही १७ वर्षांची आहे. ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. संशयित तरुणासोबत तिची ओळख झाल्यानंतर त्याने विविध ठिकाणी नेऊन तिच्यासोबत गैरकृत्य करत फोटो आणि व्हिडीओ तयार केले. आरोपी तरुण वारंवार भेटण्यासाठी पीडितेवर दबाव आणत होता. तर संशयिताच्या वडिलांनी "तुझी आई पोलिसांकडे गेली, तर तुझे आणि कुटुंबाचे आयुष्य बरबाद होईल. व्हिडीओमुळे तुम्ही अडचणीत याल. मी तुम्हाला बरबाद करेन," अशी धमकी दिली. गैरकृत्य करून फोटो तसेच व्हिडीओ तयार केल्याचे आणि वारंवार भेटण्यासाठी पीडितेवर दबाव आणत असल्याची माहिती पीडित तरुणीने तिच्या आईला दिली. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा पोलिस निरीक्षक श्रीमती मोटे तपास करत आहेत.