
मुंबई : नायर रूग्णालयात गेल्या एक दीड महिन्यापासून दाखल असलेल्या रूग्णाने मंगळवारी सकाळी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अविनाश सावंत (४०) असे या रूग्णाचे नाव असून आजारपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अविनाश सावंत यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने सुमारे दीड महिन्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील बाथरूम कडे जात असताना त्यांनी गॅलरीतून उडी मारली. त्यांना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दाखल करून घेत उपचार केले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.घटना घडली त्यावेळी सावंत यांचे नातेवाईकही रूग्णालयात होते. त्यामुळे यात संशयास्पद काहीच नसल्याने आग्रीपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.