
बुलढाणा : आधुनिक यंत्र शेतकऱ्यांचा भार हलका करण्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र गडबड गोंधळात एखादी हलगर्जी जीवघेणी ठरु शकते, याची उदाहरणं अनेक वेळा समोर आली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे असाच काहीसा प्रकार घडला. एक छोटीशी चूक शेतकरी महिलेसाठी प्राणघातक ठरली. गळ्याला गुंडाळलेला रुमाल गहू साफ करण्याच्या फिल्टर मशीनमध्ये अडकल्याने विवाहितेला प्राण गमवावे लागले. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील शेतकरी तुळशीराम शेवाळे, त्यांच्या ३५ वर्षीय पत्नी शांताबाई, आणि त्यांचा मुलगा स्वतःच्या शेतामध्ये गहू स्वच्छ करण्याच्या फिल्टर मशीनवर काम करत होते. गहू स्वच्छ करीत असताना शांताबाई शेवाळे यांच्या गळ्याला गुंडाळलेला रुमाल अचानक मशीनमध्ये अडकला. यावेळी फिल्टर मशीनमध्ये अडकलेल्या रुमालाचा गळ्याला फास बसल्याने शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण सिंदखेडराजा शहरावर शोककळा पसरली आहे. शांताबाई शेवाळे यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाव धक्क्यात आहे.शेतकरी म्हटलं की एक पाय घरात आणि एक पाय शेतात अशीच परिस्थिती पाहायला मिळते. बळीराजा आपल्या काळ्या मातीमध्ये दिवस-रात्र स्वतःला झोकून देत असतो. यावेळी तहान भूक विसरून फक्त हंगामासाठी केलेल्या मेहनतीचे बाजारापर्यंत नेऊन कसे नगदी रुपांतर केले जाईल, याच विचारामध्ये बळीराजा असतो. सध्या शेतात नवीन गहू बाजारात आणण्याची गडबड सुरू आहे. त्याला चांगल्यात चांगला भाव कसा मिळेल, याकरता त्यावर शेतात अनेक प्रक्रिया करून थेट बाजारामध्ये आणले जाते.सध्या संपूर्ण परिसरामध्ये शेताच्या कामगिरीमध्ये आलेला माल हा आधुनिक मशीनच्या सहाय्याने तयार करून त्याचे नगदी पैसे मिळवण्यासाठी शेतकरी वर्ग जुंपलेला आहे. त्याचवेळी छोट्याशा चुकीमुळे महिलेचा जीव गेल्याने परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे. शेतात काम करत असताना सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.