
मुंबई: मुलीने आईची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना लालबागच्या पेरू कंपाउंडमध्ये समोर आली आहे. वीणा जैन (वय ५५) असे मृत महिलेचे नाव असून, पोलिसांनी तिच्या हत्येप्रकरणी मुलगी रिंपल जैन (वय २४) हिला अटक केली आहे. रिंपलने आईच्या मृतदेहाचे पाच तुकडे करून घरातील कपाटात प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवले होते. सुमारे तीन महिने ती आईच्या मृतदेहासोबत राहिल्याचा अंदाज आहे. या हत्याकांडामुळे लालबागमध्ये खळबळ उडाली आहे.लालबागच्या इब्राहिम कासिम चाळीत वीणा आणि रिंपल या दोघी राहत होत्या. रिंपलच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी आजाराने निधन झाल्याने तिचा मामा दोघींची देखभाल करीत होता. मामाने पेरू कंपाऊडमधील घर वीणा आणि रिंपल यांना राहण्यासाठी दिले होते. काही दिवसांपासून सर्व नातेवाइक वीणा यांच्याशी बोलण्यासाठी रिंपलच्या मोबाइलवर संपर्क करीत होते. मात्र, आई घरात नसल्याचे किंवा अन्य कारण पुढे करून रिंपल टाळाटाळ करीत होती. मंगळवारी रिंपलची मामेबहीण पैसे देण्यासाठी घरी आला असता, रिंपलने दरवाजा किलकिला करून पैसे घेतले आणि पुन्हा बंद करून घेतला. त्या वेळी आजूबाजूच्यांनी वीणा बरेच दिवस दिसली नसल्याचे सांगितले. संशय आल्याने तिने सर्व नातेवाईकांना बोलावून घेतले. काही वेळात रिंपलचा मामा; तसेच इतर नातेवाइक तिथे पोहोचले. रिंपलला विचारताच तिने आई कानपूरला गेली असून, तिचा संपर्क होत नसल्याचे सांगितले. रिंपलला घेऊन सर्वांनी काळाचौकी पोलिस ठाणे गाठले आणि वीणा बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली. काळाचौकी पोलिसांचे पथक रिंपलच्या घरात झाडाझडती घेत असताना, प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, प्लास्टिकच्या पिशवीत वीणा यांचे धड आणि स्टीलच्या टाकीमध्ये हात व पाय कुजलेल्या स्थितीत सापडले. पोलिसांनी हे सर्व अवयव हस्तगत करून वैद्यकीय विश्लेषणासाठी रुग्णालयात पाठविले. रिंपलकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. तिचे आईसोबत पटत नव्हते, मात्र हत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. फरशी कापण्याची मशिन, कोयता आणि सुरापोलिसांनी रिंपलच्या घरातून फरशी कापण्याची मशिन, कोयता आणि सुरी हस्तगत केली आहे. या हत्यारांचा वापर करून रिंपलने आईची हत्या करून तिचे तुकडे केल्याचा संशय आहे. रिंपलने स्वतः हे कृत्य केले, की अन्य कुणाची मदत घेतली याचा तपास पोलिस करीत आहेत.