
मुंबई : पवई येथील एका बारचे शटर उचकटून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोराने पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात पोटावर चाकू लागल्याने एक कॉन्स्टेबल जखमी झाला. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून आणि बळाचा वापर करून सुब्रतो दास या चोराला अटक केली. पवईच्या साकीविहार रोड वरील संतोष बार ॲन्ड रेस्टॉरंटचे पहाटे तीनच्या सुमारास एक तरूण शटर उचकटत असल्याचे वाहतूक पोलिस रविंद्र जाधव यांनी पाहिले. संशयास्पद वाटल्याने जवळ जाऊन त्यांनी हटकले त्यावेळी या तरूणाने त्यांच्यासोबत हुज्जत घातली. त्याचवेळी पवई पोलिस ठाण्याचे गस्तीवर असलेले कॉन्स्टेबल मोहोळ, सावंत, पाचपांडे आणि धुरी त्याठिकाणी आले. त्यांनी या तरूणाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने सर्वांवर चाकूहल्ला केला. धुरी यांच्या पोटात चाकू लागल्याने ते जखमी झाले. त्याचवेळी पोलिसांनी बळाचा वापर करून तरूणाला ताब्यात घेतले.चौकशीत या तरूणाचे नाव सुब्रतो दास असे असून त्याच्या विरूध्द मानखुर्द पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. दास सराईत चोर असून गोवंडीचा राहणारा आहे.