मुंबईकरांना पाणीकपातीतून दिलासा मिळणार, या तारखेपासून पाणीपुरवठा होणार पूर्ववत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 19, 2023

मुंबईकरांना पाणीकपातीतून दिलासा मिळणार, या तारखेपासून पाणीपुरवठा होणार पूर्ववत

https://ift.tt/ywWgqtf
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेने पूर्ण केले आहे. त्यामुळे मुंबईचा पाणीपुरवठा २३ एप्रिलपासून पूर्ववत होणार असल्याची माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली. गेल्या ३१ मार्चपासून एक महिन्यासाठी १५ टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती.भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राला ७५ टक्के पाणीपुरवठा हा गुंदवली ते भांडुप संकुल दरम्यानच्या ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर जलबोगद्याद्वारे होतो. जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे (बोअरवेल) खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. दुरुस्तीसाठी जलबोगदा ३१ मार्चपासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेने ३१ मार्चपासून एक महिन्यासाठी १५ टक्‍के कपात जाहीर केली होती. या कपातीचा फटका मुंबईकरांना बसत होता. अखेर दुरुस्तीचे काम मंगळवारी पूर्ण झाले. हा जलबोगदा जमिनीपासून सुमारे १०० ते १२५ मीटर खोलवर आहे. हानी पोहोचल्याचे ठिकाण भांडुप संकुलापासून सुमारे ४.२ किलोमीटर अंतरावर होते. सुमारे १२५ मीटर खोल व ४.२ किलोमीटर लांब आतमध्ये शिरून जलबोगद्याची दुरुस्ती केली जात होती. अखेर अठरा दिवस सुरू असलेले काम पूर्ण करण्यात आले.दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर जलबोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यापूर्वी पाण्याने भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जल अभियंता विभागातर्फे १९ एप्रिलपासून आवश्यक त्या झडपांच्‍या प्रचलनास तातडीने सुरुवात करण्यात येणार आहे. जलबोगदा पाण्याने भरून घेण्यासाठी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे. या अतिरिक्त पाण्याची पूर्तता करताना सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार नसून, जलबोगदा कार्यान्वित होण्यासाठी तीन ते चार दिवस लागणार आहेत. त्यामुळे मुंबईचा पाणीपुरवठा २३ एप्रिलपासून पूर्ववत होणे अपेक्षित आहे. असे झाले कामजलबोगदा दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी पर्यायी जुन्या जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुलापर्यंत पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली आणि जलबोगदा बंद करून त्यातील पाणी उपसण्यात आले. जलवाहिन्या व जल बोगद्यावरील झडपांचे नियंत्रण तातडीने केले. एकूण झडपांपैकी सर्वांत मोठ्या ३७५० मिलीमीटर व्यासाच्या झडपेचे यशस्वीरित्या नियंत्रण केले. प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम ३१ मार्चला सुरू झाले. यानंतर भांडुप व कापूरबावडी येथील झडपेचे पोलादी घुमट कापून क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आले. नंतर संपूर्ण जलबोगद्याचे निरीक्षण करण्यात आले. भगदाड पडून हानी पोहोचलेल्या ठिकाणी आतमध्ये पॅकर टाकून आणि अन्य साहित्य वापरून पाणी गळती बंद करण्‍यात आली. त्यानंतर वागळे इस्टेट येथील १०० मीटर खोलीच्या कुपनलिकेमध्ये विशिष्ट प्रकारचे सिमेंट व वाळू यांचे मिश्रण टाकून ते बंद करण्यात आले. यानंतर कापुरबावडी व भांडुप संकुल येथील पोलादी घुमट (डोम) वेल्डिंगच्या सहाय्याने पुन्हा बंद करण्यात आले.