
सिंधुदुर्ग : प्रेम संबंधाच्या रागातून केलेल्या मारहाणीत बोर्डवे सुंदर वाडी येथील दीपक वामन येंडे (वय ५६, सध्या रा. कट्टा एसटी स्टॅंण्डच्या पाठीमागे ता. मालवण) यांचा मृत्यू झाला. दीपक यांचा भाऊ संतोष वामन येंडे (वय ५२, रा. बोर्डवे सुंदरवाडी) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संतोष शेंडे यांच्या तक्रारीवरून गणेश गावडे (वय सुमारे ३५), अनाजी गावडे (वय ४०) आणि एक अनोळखी इसम अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मौजे चौके भराडी मंदीर नजीक माळरानावर घडली.संतोष येंडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, "मी माझी पत्नी सुजाता, आई जयवंती, मुलगा विराज, मुलगी तन्वी, तसेच माझा मोठा भाऊ सखाराम, त्याची पत्नी आणि मुलगा आम्ही सर्व बोर्डवे येथे एकत्र कुटुंबात राहतो. माझा दोन नंबरचा भाऊ दीपक वामन येंडे हा कट्टा एसटी स्टँडच्या पाठीमागे सध्या एकटाच भाड्याने राहण्यास आहे. त्याचे चौके बाजार येथे बांगडी विकण्याचे दुकान आहे". "त्याची पत्नी दोन वर्षांपूर्वी मयत झालेली आहे. त्याची मोठी मुलगी प्रियांका दीपक येंडे ही तिच्या पतीसह नालासोपारा येथे राहण्यास आहे. तसेच लहान मुलगी प्राजक्ता ही तिच्याकडे राहते. ८ एप्रिल रोजी मी माझे कुटुंबासमवेत घरी जाताना रात्री १०:४७ वाजता माझ्या पुतणी प्रियांकाचा माझ्या मोबाईलवर फोन आला. तिने पप्पांना कोणीतरी चौके येथे मारत आहे तुम्ही ताबडतोब तेथे जा, असं सांगितलं"."त्यावर मी तिला कोण मारत आहे? असं विचारले असता गणेश गावडे नामक कोणीतरी इसम आहे, असं त्याने पप्पांच्या मोबाईलवरून फोन करून सांगितलं आहे. त्यानंतर मी माझा भाऊ दीपकच्या मोबाईल वर कॉल केला असता त्या इसमाने फोन उचलला. मी त्याला काय झाले असं विचारले असता त्याने तुमचा भाऊ जिवंत हवा असेल तर ताबडतोब या, असं सांगितलं". "फोन चालू असताना सोडू नको असा बोलायचा आवाज येत होता. त्यावर मी त्याला कुठे यायचं आहे, असं विचारलं असता त्याने कुपेरीची घाटी चढल्यावर फोन करा कुठे यायचे ते मी तुम्हाला सांगतो. त्यांना मी विनंती केली तुम्ही भाऊ दीपक याला मारू नका मी लगेच निघतो आहे. भाऊ संतोष यांनी त्यांचा मुलगा रोहित पत्नी सुजाता आणि मुलगा विराज शेजारी राहणारा चुलत भाऊ विठ्ठल बाळकृष्ण येंडे यांना लगेच सांगितलं. त्यानंतर मुलगा विराजने त्याचा मित्र मनीष याला फोन करून त्याची ईको गाडी आमच्या घराजवळ बोलावून घेतली. मनीष गाडी घेऊन आल्यानंतर त्याच्या गाडीने रात्री ११ वाजताच्या सुमारास मी, चुलत भाव विठ्ठल येंडे, पुतण्या रोहित चौके येथे जाण्यास निघालो". "आम्ही कसाल मार्गे कुपेरीची घाटी चढून आल्यानंतर भाऊ दीपकच्या मोबाईलवर फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु फोन लागला नाही म्हणून आम्ही चौके बाजारात गेलो. त्यानंतर परत फोन लावला त्यावेळी त्याच इसमाने फोन उचलला आणि आम्हाला परत यायला सांगून भराडी मंदिराजवळ आलात की गाडी स्लो करा मी रोडवर थांबतो, असं सांगितलं. त्याचप्रमाणे आम्ही भराडी मंदिराच्या दिशेने जाण्यास निघालो. भराडी मंदिराच्या पुढे समोर १०० मीटर अंतरावर एक इसम रस्त्यावर थांबलेला दिसला त्यांनी आम्हाला हाताने गाडी रस्त्याच्या डाव्या साईडला लावायला सांगितली". "आम्ही सर्वजण गाडीतून उतरलो आणि पाहिले असता माझा भाऊ दीपक हा मान जमिनीला टेकून बसलेला होता तसेच त्याचे दोन्ही पाय रक्तबंबाळ झालेले होते. रस्त्यावर आलेल्या इसमासोबत अन्य दोन अनोळखी इसम त्या ठिकाणी होते. त्यावेळी ते तीघेजण दीपकला शिवीगाळ करत होते. मी त्यांना काय झालं कोण तुम्ही त्यावर त्यांच्यापैकी एकाने तुझा भाऊ माझ्या बहिणीची छेड काढतो त्यामुळे त्याला प्रसाद दिला आहे. तो परत इकडे दिसला तर त्याला जिवंत ठेवणार नाही, असं म्हणत दीपक याच्या केसाला धरून हाताच्या थापटाने दोन वेळा थोबाडीत मारले". "तसेच सोबतचा इसम दीपकच्या कमरेवर लाथा मारू लागला. त्यावर पुतण्या रोहित याने त्यांना मारण्यापासून अडवलं. त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण गणेश गावडे याला सोडू नको असे म्हणत होता. मी त्या दोन्ही इसमांना नाव विचारलं असता एकाने त्याचं नाव अनाजी गावडे असं सांगितलं परंतु तिसरं नाव सांगायला तयार नव्हता. आम्ही सर्व जण त्यांना दिपक याला मारू नका अशा विणवण्या करून त्या तिघांच्या तावडीतून सोडवून दिपकला आमच्या गाडीत बसवले. त्यानंतर दिपकला उठवण्याचा प्रयत्न करत होतो. परंतू तो काही प्रतिसाद देत नव्हता. आम्ही त्याला उपचाराकरता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी भाऊ दिपकला तपासून तो मयत झाल्याबाबत सांगितले", असं तक्रारीत म्हटलं आहे.याबाबत मालवण पोलीस ठाण्यात रविवारी भा. द. वि. कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तर तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.