
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मेट्रो ६ या मार्गाच्या कारशेडसाठी कांजुरमार्गला जागा देण्याच्या निर्णयावरून माजी पर्यावरणमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. ‘मुंबईवर पहिला वार करून मेट्रोची कारशेड पुन्हा आरे वसाहतीत नेण्यात यश मिळवल्यानंतर आता एका मेट्रो मार्गासाठी कांजुरमार्गचीच जागा निवडण्यात आली आहे. या शिंदे सरकारचा मुंबईवर एवढा राग का आहे’ असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला.आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारचा समाचार घेतला. ‘राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून मेट्रो ६च्या कारशेडसाठी कांजुरमार्गची जागा ‘एमएमआरडीए’कडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या आरे वनजमिनीऐवजी कांजुरमार्गला कारशेड करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्या जागेवर केंद्र सरकारसह खासगी व्यक्तींनी दावे सांगितले होते. आता ते सर्व दावे कसे बाजूला झाले? कांजुरमार्गच्या १५ हेक्टर जागेवर कारशेड होणार असून, उर्वरित जागेचे काय करणार?’, असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारले.‘मुंबईवर राग ठेऊन राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्र सरकारला हाक मारली. केंद्राच्या अखत्यारीतील मीठ आयुक्त, बिल्डरांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडेपर्यंत मेट्रोचे काम बंद ठेवले होते. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी मागच्या राजवटीत आम्ही निवडलेली कांजुरमार्गची जागाच पुन्हा निवडली आहे. सर्वोच्च न्यायालयातील खटला मागे घेण्यात आला. ४४ हेक्टरपैकी १५ हेक्टर क्षेत्रावर कारशेड होणार आहे. मग ही जमीन कोणाच्या मालकीची आहे? संबंधितांना भरपाई देणार आहेत की नाही? बाकी जमीन कोणत्या बिल्डरांना देणार आहात याची माहिती जनतेसाठी राज्य सरकारने जाहीर करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. मेट्रो ३ची कारशेड आरे वसाहतीत, मेट्रो ६ची कारशेड कांजुरमार्ग येथे नेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मेट्रो ४ आणि १४ एमएमआरडीएला जोडणार आहेत. या दोन्हींची कारशेड ठाणे जिल्ह्यात आहेत. यात मुख्यमंत्र्यांचा किती हात होता हे माहिती नाही. मात्र, कारशेडसाठी जागा हस्तांतरीत होणार असून, यात कोणाची मध्यस्थी आहे का? कोणाच्या नावावर सात-बारा उतारे आहेत. कोणत्या आणि कोणाच्या मतदारसंघात जमिनी घेणार आहेत, असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारले आहेत.