
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआयने रविवारी नऊ तास चौकशी केली. रविवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास केजरीवाल सीबीआयच्या मुख्यालयात पोहोचले. तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. या चौकशीच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी धरणे आंदोलन केले. यामुळे दिल्लीतील अनेक भागांत वाहतूककोंडी झाली होती.दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचीही सीबीआयने चौकशी केली होती. त्यांना २६ फेब्रुवारीला अटक करण्यात आली. सिसोदिया यांच्या चौकशीतून काही मुद्दे उपस्थित झाले असून त्याविषयी केजरीवाल यांची साक्ष सीबीआयला हवी आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी रविवारी सीबीआयच्या तपास पथकासमोर उपस्थित राहावे, असे समन्स शुक्रवारी बजावण्यात आले होते. त्यानुसार केजरीवाल रविवारी सीबीआयच्या मुख्यालयाच्या दिशेने रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तसेच, दिल्ली मंत्रीमंडळातील काही सहकारी होते.'मला सुमारे ५६ प्रश्न विचारण्यात आले. मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मी आधी म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. कथित दारू घोटाळा खोटा, बनावट आणि गलिच्छ राजकारणाने प्रेरित आहे... आम्ही मरण पत्करू, पण प्रामाणिकपणा सोडणार नाही', अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी रात्री साडेआठच्या सुमारास सीबीआय मुख्यालयातून बाहेर पडल्यानंतर दिली.हे उत्पादन शुल्क धोरण निश्चित करण्यात केजरीवाल यांची नेमकी काय भूमिका होती, तसेच या धोरणाचा मसुदा आखताना त्यांचा सहभाग होता का, यावर त्यांना प्रश्न विचारले जाऊ शकतात, असे सीबीआयच्या सूत्रांनी सकाळी सांगितले होते. या धोरणाच्या अंमलबजावणीपूर्वी या धोरणासंबंधी तज्ज्ञ समितीचा अभिप्राय, नागरिकांचे अभिप्राय, कायदेशीर अभिप्राय याचा समावेश असणारी एक फाइल केजरीवाल मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करणे नियोजित होते. परंतु ती फाइल मंत्रीमंडळापुढे आलीच नाही व यंत्रणांना आता तिचा मागही लागत नाही. त्यामुळे या फाइलविषयीही केजरीवाल यांची चौकशी होईल, अशी शक्यता या सूत्रांनी वर्तवली होती. 'ते कोणालाही तुरुंगात पाठवू शकतात...'सीबीआय मुख्यालयात रवाना होण्यापूर्वी केजरीवाल यांनी पाच मिनिटांचा एक व्हिडीओ प्रसारित करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. 'भाजपने सीबीआयला माझ्या अटकेचे आदेश दिले असण्याची शक्यता आहे. ते अतिशय शक्तिशाली आहेत व एखादी व्यक्ती दोषी असो अथवा नसो, ते कोणालाही तुरुंगात पाठवू शकतात', असा आरोप केजरीवाल यांनी व्हिडीओमध्ये केला. पंधराशे कार्यकर्त्यांना अटककेजरीवाल यांच्या चौकशीच्या निषेधार्थ 'आप'च्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत ठिकठिकाणी निषेध करून वाहतुकीस वेठीस धरले. याप्रकरणी सुमारे पंधराशे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. आनंद विहार टर्मिनल, आयटीओ चौक, मुकारबा चौक, पीरा गढी चौक, लाडो सराई चौक, क्राउन प्लाझा चौक, द्वारका सेक्टर ६, सुभाष नगर, न्यू दिल्ली रेल्वे स्टेशन आजमेरी गेट, बारा हनुमान मंदिर, करोल बाग चौक, आयआयटी क्रॉसिंग, आयएसबीटी काश्मिरी गेट, राजघाट आदी ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या सर्व ठिकाणी आम्ही पुरेसा पोलिस बंदोबस्त राखला होता. परंतु कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने त्यांना तेथून हटविण्यात बराच वेळ गेला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.मुख्यालयाबाहेर मोठा फौजफाटासीबीआयच्या मुख्यालयाबाहेर आम आदमी पक्षाचे असंख्य कार्यकर्ते जमा होतील ही शक्यता गृहीत धरून तेथे एक हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामध्ये पोलिसांसह निमलष्करी दलाच्या जवानांचाही समावेश होता. या परिसरात जमावबंदीचा आदेशही लागू करण्यात आला होता.गुजरातमधील न्यायालयाचे समन्सअहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीवरून उपरोधिक व मानहानीकारक वक्तव्ये केल्याच्या आरोपांवरून अहमदाबादमधील अतिरिक्त मुख्य नगर दंडाधिकाऱ्यांनी केजरीवाल व आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांना समन्स बजावले. या दोघांना २३ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. गुजरात विद्यापीठाचे निबंधक पीयूष पटेल यांनी ही तक्रार केली आहे.