https://ift.tt/uSazTb2
नवी मुंबई: ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'ने रविवारी खारघरच्या सेंट्रल पार्कवर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. तर जवळपास २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सगळ्यामुळे या सोहळ्याच्या नियोजनातील अक्षम्य त्रुटी आणि ढिसाळ कारभाराच्या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे. मात्र, सदोष नियोजनासोबतच आणखी एक घटक श्री सेवकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला. तापमानातील उष्मा आणि एकाचवेळी झालेली प्रचंड गर्दी या गोष्टी ११ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या. हवामान विभागाच्या माहितीनुसार नवी मुंबईमध्ये रविवारी ३७ अंश सेल्सिअस तापमान होते. हवेत आर्द्रताही अधिक होती. अनुयायांना पाच तास उन्हात बसावे लागले. लाखोंचा जनसागर एकत्र आल्याने उष्णता आणि आर्द्रता वाढली. यामुळे शेकडो अनुयायांना त्रास झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. खुद्द अमित शहा यांनी आपल्या भाषणात तापमान ४२ अंशांच्या आसपास असल्याचा उल्लेख केला होता. इतक्या उष्ण तापमानात सामान्य अनुयायी रणरणत्या उन्हात डोक्यावर कोणतेही छप्पर नसताना तासनतास बसून राहिले. या सगळ्यांना वेळेत पाणी आणि वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे दुर्दैवी प्रकार घडला, असे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र भूषण सोहळ्यात नेमकं काय घडलं?
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान करतानाचे क्षण अनुभवता यावेत, यासाठी राज्यभरातून त्यांचे तब्बल २५ लाख भाविक खारघरच्या सेंट्रल पार्कवर जमले होते. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी जमवण्यात आली असली तरी येथील नियोजन अत्यंत ढिसाळ होते. मैदानाभोवती मेडिकल बुथ होते, पण उष्णतेमुळे प्रकृती बिघडलेल्या लोकांची संख्या खूपच जास्त होती. कार्यक्रमाची वेळ सकाळी १० वाजताची होती, परंतु हा कार्यक्रम दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहिला. त्यामुळे सामान्य अनुयायांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला.या कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमणार असल्याने पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, पाण्याचे टँकर्स मैदानापासून दूर ठेवण्यात आले होते. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पाहण्यासाठी त्यांचे अनुयायी शनिवारी रात्रीच नवी मुंबईत दाखल झाले होते. रविवारी सकाळी कार्यक्रम संपल्यानंतर आपण घरी जाऊन, असा त्यांचा अंदाज होता. त्यासोबत या अनुयायांनी स्वत:सोबत सकाळपर्यंत पुरेल इतके जेवण किंवा अन्नपदार्थ आणले होते. मात्र, कार्यक्रम दुपारपर्यंत सुरु राहिला, तोपर्यंत हे अनुयायी उपाशीच राहिले. अशातच बराच काळ पाणी न मिळाल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले. परिणामी उष्माघाताचा परिणाम जास्त झाला.सामान्य लोक रणरणत्या उन्हात बसले असताना व्यासपीठावर राजकीय नेते आणि मान्यवरांसाठी मात्र वेगळी व्यवस्था होती. व्यासपीठाच्या तिन्ही बाजूला कुलर्स लावण्यात आले होते. व्हीआयपी लाउंजला वर शेड होती. त्याठिकाणी पंखे, खुर्च्या अशी सर्व सोय होती. याउलट सामान्य अनुयायी रणरणत्या उन्हात मातीत खालीच बसले होते. तहानलेले अनुयायी बराच वेळ पाणी मागत होते, पण त्यांना पाणी मिळू शकले नाही. कार्यक्रम संपताच २५ लाखांची गर्दी एकत्र मैदानाबाहेर पडली. त्यामुळे उष्माघातामुळे बेशुद्ध पडलेल्या अनुयायांना रुग्णालयात घेऊन चाललेल्या रुग्णवाहिकांचा रस्ता अडला. परिणामी अनुयायांना वेळेत उपचार मिळण्यात अडचण आली. या सगळ्यामुळे ११ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती आहे.