
जयपूर: आयपीएल २०२३ मध्ये काल बुधवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंटसने राजस्थान रॉयल्सचा १० धावांनी पराभव केला. या सामन्यात गोलंदाजीत आणि फलंदाजीत सुरुवातीपासून राजस्थानचा दबदबा होता. पण अखेरीस लखनौने दमदार कामगिरी करत कमबॅक केले. या पराभवानंतर देखील राजस्थानचे अव्वल स्थान कायम आहे. तर लखनौने देखील दुसरे स्थान कायम ठेवले असून त्याचे गुण ८ झाले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौ सुपर जायंटसने २० षटकात १५४ धावा केल्या. उत्तरादाखल राजस्थानला २० षटकात ६ बाद १४४ धावा करता आल्या. लढतीच्या पहिल्या डावात गोलंदाजी करणाऱ्या राजस्थानकडून जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टने कमाल केली. टी-२० क्रिकेटमध्ये फार कमी वेळा अशी गोष्ट होती. बोल्टच्या या पहिल्या ओव्हरमध्ये ६ चेंडूवर एकही धाव दिली नाही. लखनौच्या सलामीवीरांना एक रन देखील काढता आली नाही. मॅचमधील पहिलीच ओव्हर मेडन झाली. २०२० नंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर बोल्टच्या नावावर आहेत. बोल्टने या ३ वर्षात एकूण १० वेळा अशी कामगिरी केली आहे. याबाबत भारताचा जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. या दोघांनी प्रत्येकी ४ वेळा मेडन ओव्हर टाकली आहे. गेल्या वर्षी नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायंटस संघासाठी केएल राहुल लकी चार्म ठरला आहे. लखनौच्या आधी राहुल पंजाब किंग्जचा कर्णधार होता तेव्हा विजयाची टक्केवारी फक्त ४४.४४ इतकी होती. पण लखनौच्या संघाची विजयाची टक्केवारी ६१.९० इतकी आहे. गुणतक्त्यात राजस्थान रॉयल्सचा संघ ८ गुण आणि प्लस १.४३ नेट रनरेटसह अव्वल स्थानी आहे. लखनौ संघाचे देखील आठ गुण आहेत, मात्र त्यांचे नेट रनरेट प्लस ०.७०९ इतके आहे. चेन्नई सुपर किंग्ज तिसऱ्या तर गुजरात टायटन्स चौथ्या स्थानावर आहेत. गुणतक्ता१) राजस्थान रॉयल्स२) लखनौ सुपर जायंटस३) चेन्नई सुपर किंग्ज४) गुजरात टायटन्स५) पंजाब किंग्ज६) मुंबई इंडियन्स७) कोलकाता नाईट रायडर्स ८) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू९) सनरायझर्स हैदराबाद१०) दिल्ली कॅपिटल्ससर्वाधिक धावा- फाफ डु प्लेसिस (२५९ धावा)सर्वाधिक विकेट- मार्क वुड (११ विकेट)