
वृत्तसंस्था, जम्मू : जम्मू-काश्मीरच्या जम्मू जिल्ह्यात मंगळवारी वैष्णोदेवी येथे जाणारी बस पुलाच्या रेलिंगला धडकून खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या दहा भाविकांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश भाविक हे बिहारचे असून, ५७ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची स्थिती गंभीर आहे.ही बस अमृतसर येथून कटरा येथे जात होती. यावेळी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. ‘झज्जर कोटली पुलावर अपघात घडला. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला. बचावकार्य जवळपास पूर्ण झाले आहे,’ असे जम्मूचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक चंदन कोहली यांनी सांगितले. ‘या अपघातामागील कारणांचा आम्ही शोध घेत आहोत,’ असेही ते म्हणाले. अपघात घडल्यावर स्थानिक नागरिक, ‘सीआरपीएफ’चे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. ‘अपघातग्रस्त बसमधून जखमी चालक आणि प्रवाशांची सुटका करण्यासाठी १३७ सीआरपीएफ बटालियनच्या जवानांनी बचावकार्य केले,’ अशी माहिती ‘सीआरपीएफ’कडून ट्वीटद्वारे देण्यात आली. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील भाविकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. राज्यातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले.अडीच वर्षाच्या मुलीच्या 'मुंडण' कार्यक्रमासाठी पंजाबमधील अमृतसर आणि बिहारमधील लखीसराई जिल्ह्यातील नातेवाईक आणि त्यांचे निकटवर्तीय असे मिळून जवळपास ७० हून अधिक लोक वैष्णोदेवीला नि्घाले होते. मात्र, वाटेतच बस पुलावरुन खाली कोसळल्यानं १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये बसचालक गणेश कुमार याचा देखील मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय पाच महिलांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर, १२ वर्षांच्या कुमार शर्मा याचा मृत्यू झाला आहे. ललिता देवी, कमला देवी, फुल्लू देवी, जुल्ली देवी आणि तिचा पती अरविंद शर्मा, बिमला देवी, कैलाश शर्मा आणि राजिंदर शर्मा यांचा या अपघातात मृत्यू झाला. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांपर्यंतची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, गंभीर जखमींना ५० हजार रुपये द्यावेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला.