
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई पूर्व उपनगर ते शहर यामधील महत्त्वाचा पूल असणाऱ्या परळ टी टी उड्डाणपूलाच्या डागडुजीचे काम मुंबई महापालिकेच्या पूल विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी पावसाळी कामांसाठी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकांवर जोडणीचे सांधे (एक्स्पान्शन जॉइंट) भरण्यासह रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावर दुचाकी आणि अवजड वाहनांना १ जूनपासून बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली.परळ टीटी उड्डाणपूलावर पावसाळ्याच्या कालावधीत गैरसोय होऊ नये म्हणून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. याठिकाणी अवजड वाहनांमुळे दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणत खड्डे पडतात. उड्डाणपुलावर अवजड वाहनांसाठी बंदी घालण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबई महापालिकेला केली होती. अवजड वाहनांना मज्जाव करण्यासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र मुंबई वाहतूक पोलिसांकडून पालिकेला मिळाले आहे. त्यामुळे सुरू होण्यापूर्वीच अवजड वाहनांना प्रवेशबंदी करणारा हाइट बॅरिअर लावण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. याठिकाणी अडीच मीटरपेक्षा अधिक उंचीच्या वाहनांना प्रवेश करता येणार नाही. पुलाच्या प्रसरण सांध्याचा भाग सद्यस्थितीत वाहतुकीसाठी योग्य नाही. त्यामुळे पुलाचे बळकटीकरण होईपर्यंत दुचाकींसाठी तो वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याचे पालिकेने म्हटले आहे. वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या फक्त रात्रीच्या वेळेत या पुलावर दुरूस्ती आणि देखभालीचे काम करण्यात येत आहे. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेतच वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार याठिकाणी खड्डे आणि सांधे भरण्याचे काम सुरू आहे.ऑक्टोबरपासून उड्डाणपुलाचे सक्षमीकरणमुंबई महापालिकेच्या लोअर परळ रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या डिलाइल रोड उड्डाणपूलाचे काम सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे लोअर परळच्या उड्डाणपुलाचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर परळ टीटी उड्डाणपुलाचे काम ऑक्टोबरपासून हाती घेण्यात येणार आहे. तेथे एक भक्कम रॅम्प टाकून सध्याच्या उड्डाणपुलावर नव्या मार्गिकांचा पर्याय वाहनचालकांना मिळेल. पुलाच्या सक्षमीकरणासाठी खालच्या बाजूच्या पोकळीच्या जागा भराव टाकून भरण्यात येणार आहेत. या कामासाठी साधारण ६ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. यासाठी १८ कोटी रुपये खर्च अंदाजित आहे.