मुंबईत म्हाडाच्या लॉटरीला सुरुवात होताच उदंड प्रतिसाद; पहिल्याच दिवशी इतके अर्ज दाखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 23, 2023

मुंबईत म्हाडाच्या लॉटरीला सुरुवात होताच उदंड प्रतिसाद; पहिल्याच दिवशी इतके अर्ज दाखल

https://ift.tt/MbZ9PA0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत घरांच्या सोडतीस सोमवारपासून सुरुवात झाली. ४,०८३ घरांच्या सोडतीसाठी पहिल्याच दिवशी ६५५ जणांनी अर्ज भरले आणि त्यातील २०८ जणांनी अर्जांची रक्कमही भरली आहे. म्हाडाच्या वांद्रेतील मुख्यालयात दुपारी २ वाजता या योजनेचा शुभारंभ पार पडला. यावेळी, अवघ्या १० मिनिटांमध्ये ११५ अर्जदारांनी अर्ज भरले. त्यानंतर सायंकाळपर्यंत अर्जदारांची संख्या ६५५वर पोहोचली.म्हाडाच्या घरांच्या सोडतीकडे लक्ष ठेवून असलेल्या मुंबईकरांनी घरांच्या सोडतीच्या पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद दिला. म्हाडाने मुंबईतील घरांच्या सोडतीत अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत घरांसाठी सोडत जाहीर केली. या घरांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी, अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सोमवारी केला. म्हाडाने गो लाइव्ह अंतर्गत केलेल्या कार्यक्रमानंतर अर्जदारांनी लगेचच अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली. म्हाडाने मुंबईत सुमारे चार वर्षांनंतर जाहीर केलेल्या सोडतीस प्रचंड प्रतिसाद लाभेल, हा होरा खरा ठरताना दिसत आहे. माहिती पुस्तिका उपलब्धघरांच्या सोडतीसंदर्भातील माहिती पुस्तिकेचेही बोरीकर यांनी प्रकाशन केले. या पुस्तिकेत सोडत प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नियमावली, मार्गदर्शक सूचना, सदनिकांचे विवरण, पात्रतेचे निकष, आरक्षण प्रवर्ग आदी माहिती आहे. ही पुस्तिका https://ift.tt/akbWlHr या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर क्विक लिंक या विंडोमध्ये उपलब्ध आहे.सात प्रकारची कागदपत्रे आवश्यकसोडतीसाठी अर्जदारांना सात प्रकारची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्यात अर्जदारांना उत्पन्नाचा दाखला वा २०२१-२२ आर्थिक वर्षातील प्राप्तिकर विवरणपत्र सादर करावे लागेल. सर्व कागदपत्रे सादर करणारे अर्जदार हे संगणकीय सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यास पात्र ठरतील. त्यांच्या अर्जांची सोडत काढल्यानंतर पात्र अर्जदार निश्चित होतील.