
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुलुंडमधील महाकवी कालिदास नाट्यगृह येथील मुंबई महापालिकेच्या जलतरण तलावाबाबत पालिकेने लावलेल्या फलकांवरून मंगळवारी राजकीय वातावरण तापले. जलतरण तलावातील उन्हाळी प्रशिक्षण सत्रांची माहिती देण्यासाठी महापालिकेने नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारांवर गुजराती भाषेत फलक झळकावले. ही बाब निदर्शनास येताच मनसेकडून आक्षेप घेण्यात आल्यानंतर व्यवस्थापनाने हे फलक हटवले.मुंबईत विविध खासगी संस्थांद्वारे १५ दिवसांच्या जलतरण प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यासाठी साधारणपणे सहा हजार रुपयांपर्यंत शुल्क असते. या अनुषंगाने माफक शुल्कात म्हणजेच १५ वर्षांपर्यंत दोन हजार रुपये, तर त्यापुढील वयोगटासाठी तीन हजार रुपये अशा शुल्कात प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. सध्या मुंबई पालिकेकडून २१ दिवसांचे प्रशिक्षणवर्ग घेण्यात येतात. पालिकेच्या जलतरण तलावांसाठी २ मे ते २२ मेपर्यंत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर २३ मे ते १२ जून या कालावधीदरम्यान जलतरण प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील सहा जलतरण तलावांमध्ये आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात साधारणपणे सहा हजार प्रशिक्षणार्थींना नोंदणी करता येते.याच प्रशिक्षण सत्राची सर्व माहिती मुलुंडच्या महाकवी कालिदास नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारांवर गुजराती भाषेत झळकली. या नाट्यगृहाच्या आवारात पालिकेचा प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जलतरण तलाव आहे. पालिकेकडून येथेही प्रशिक्षणासाठी उन्हाळी सत्र घेण्यात येत असून, त्याच्या माहितीचे फलक गुजरातीत झळकवण्यात आल्याचे मनसेचे उपाध्यक्ष सत्यवान दळवी यांनी सांगितले. ‘मुंबई पालिकेच्या संबंधित विभागाकडूनच गुजराती भाषेत फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही बाब नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली व फलक काढण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर गुजराती भाषेतील हे फलक काढण्यात आले’, असेही दळवी म्हणाले.