Dhoni चा एक मास्टरस्ट्रोक ज्यानं गुजरातचा हुकमी एक्का मैदानाबाहेर, हार्दिकचं सगळं गणित बिघडून गेलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 24, 2023

Dhoni चा एक मास्टरस्ट्रोक ज्यानं गुजरातचा हुकमी एक्का मैदानाबाहेर, हार्दिकचं सगळं गणित बिघडून गेलं

https://ift.tt/KAq7Xmn
चेन्नई: महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्जनं गुजरातला पराभूत करत आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चेन्नईची टीम आतापर्यंत दहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. काल रात्री झालेल्या आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईनं गुजरातला पराभवाची धूळ चारली. गुजरातच्या संघासमोर चेन्नईनं १७३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या चेन्नईनं ७ विकेटवर १७२ धावा केल्या होत्या. १७३ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातची सुरुवात अडखळत झाली. पॉवरप्लेमध्येच गुजरातनं दोन विकेट गमावत ४१ धावा केल्या होत्या. हा त्यांच्या यंदाच्या हंगामातील पॉवरप्लेमधील तिसरा कमी स्कोअर होता. शुभमन गिलनं ४२ धावा आणि राशिद खाननं ३० धावा करुन गुजरातसाठी लढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही. राशिद खान ३० धावा करुन बाद झाला अन् गुजरातचा पराभव निश्चित झाला होता.

स्पिनर्सपुढं गुजरातची दैना

गुजरात टायटन्सला रविंद्र जाडेजा आणि महीष तीक्षणा या जोडीनं खरा दणका दिला. जाडेजानं दाशुन शनाका आणि डेव्हिड मिलर ला बाद केलं. त्यावेळी गुजरातची धावसंख्या ४ बाद ८८ इतकी होती. दुसऱ्या बाजूनं शुभमन गिल मैदानात असल्यानं गुजरातची बाजू वरचढ मानली जात होती. अशावेळी महेंद्र सिंह धोनीनं गोलंदाजीची जबाबदारी सर्वाधिक विश्वास असलेल्या दीपक चाहरच्या हातात दिली. दीपक चाहरनं अगोदर वृद्धिमान साहाला बाद केलं होतं. १४ व्या ओव्हरमध्ये धोनीनं दीपक चाहरला गोलंदाजी दिली. त्यानं ज्यासाठी धोनीनं गोलंदाजी दिली ते काम पूर्ण केलं. दीपक चाहरनं शुभमन गिलला ४२ धावांवर बाद केलं. इथूनच चेन्नईनं सामन्यावरील आपली पकड मजबूत केली.

हार्दिक पांड्याचं गणित फसलं

गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्यानं यापूर्वी आठ सामन्यांमध्ये टॉस जिंकला होता. कालच्या मॅचमध्ये देखील हार्दिक पांड्यानं टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंत हार्दिकला आठ पैकी सहा सामन्यामध्ये विजय मिळाला होता. त्या सहा सामन्यांमध्ये गुजरातनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणं क्वालिफायरच्या सामन्यात देखील हार्दिकनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेपॉकच्या धिम्या होणाऱ्या खेळपट्टीवर दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय गुजरातच्या अंगाशी आला.

गुजरातकडे अजून एक संधी

गुजरातच्या संघानं चेन्नई विरुद्ध पराभव स्वीकारला असला तरी त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपलेलं नाही. गुजरातला अजून एक संधी असून मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजाएंटस यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध गुजरातची लढत होणार आहे. त्या लढतीत गुजरातनं विजय मिळवल्यास ते दुसऱ्यांदा आयपीएलच्या फायनल मध्ये पोहोचू शकतात.