
नवी दिल्ली : सोशल मीडिया वापरत असताना सतर्कता दाखवली नाही की काय होतं याचा अनुभव टीम इंडियाचा क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदर यानं घेतला आहे. त्यानं एक पोस्ट करुन त्याच्यासोबत जे घडलं त्यासंदर्भात माहिती दिली आहे. वॉशिंग्टन सुंदरनं त्याच्या ट्विटर अकाऊंट संदर्भात अपडेट दिली आहे. ट्विटमध्ये त्यानं गेल्या काही दिवसात त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात येत असलेल्या पोस्टबद्दल माहिती दिली.गेल्या काही दिवसांपासून माझ्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात येत असलेली काही ट्विट त्यानं केली नव्हती, असं वॉशिंग्टन सुंदर म्हणाला. त्या ट्विटमधील मजकूर देखील आपला नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे. सध्या ट्विटर खात्यावर पुन्हा निंयत्रण मिळवलं आहे, असं तो म्हणाला. ट्विटर खात्याच्या सुरक्षेसाठीच्या आवश्यक असलेली खबरदारी घेईन, असं तो म्हणाला. गेल्या काही दिवसांतील ट्विटसमुळं झालेल्या त्रासाबद्दल माफी मागतो. मला तुम्ही पाठिंबा दिल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल आभारी आहे, असं तो म्हणाला. वॉशिंग्टन सुंदरचं ट्वविटर अकाऊंट ५ जूनच्या दरम्यान हॅक करण्यात आलं होतं. त्या अकाऊंटववरुन क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भात पोस्ट करण्यात आलं होतं. यापूर्वी लखनऊ सुपर जाएंटसचा खेळाडू कृणाल पांड्यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करुन क्रिप्टोकरन्सीसंदर्भात पोस्ट करण्यात आलं होतं. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं देखील अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. वॉशिंग्टन सुंदर यानं क्रिकेटच्या तिन्हा प्रकारात भारताकडून प्रतिनिधीत्व केलं आहे. टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यात त्यानं २०१७ मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं होतं. तर, २०२१ मध्ये कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केलं आहे. वॉशिंग्टन सुंदरकडे भारताचा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून पाहिलं जातं.दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरचे टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वॉशिंग्टन सुंदर आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादच्या संघाकडून क्रिकेट खेळतो. तो दुखापतग्रस्त असल्यानं आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादची कामगिरी देखील निराशाजनक राहिली. सनरायजर्स हैदराबादनं आयपीएलमध्ये एका हंगामात विजेतेपद देखील मिळवलं आहे. त्यानंतर त्यांना तशी कामगिरी पुन्हा करता आलेली नाही.