
डोंबिवली: पश्चिम डोंबिवलीतील भावे सभागृहाजवळ असलेल्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखावर ४ अनोळखी इसमांनी हल्ला केला आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांच्या सुमारास घडली. राजेश बाळाराम पाटील (५०, रा. साई चिंतामणी बिल्डींग, गांधी गार्डनजवळ डोबिवली-प.) असे तक्रारदार शाखाप्रमुखाचे नाव असून त्यांनी या संदर्भात विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या सेवानिवृत्त असलेले राजेश पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक शाखाप्रमुख म्हणून काम पाहतात. रविवारी संध्याकाळच्या सुमारास राजेश पाटील हे शाखेत बसलेले असताना त्यांच्या शाखेसमोर वाहनांची गर्दी होती. त्याचवेळी शाखेच्या बाहेर एक ५० वर्षीय अनोळखी इसम रस्त्यावर त्याच्या मोबाईलवर बोलत होता. राजेश पाटील यांनी त्याला रस्त्यावरून गाडी बाजूला घेऊन फोनवर बोल, अशी विनंती केली. या बोलण्यावर संतापलेल्या सदर इसमाने तू मला विचारणारा कोण? असा सवाल करत शिवगाळ केली. शिव्या देऊ नका, असे बोलणाऱ्या शाखाप्रमुख राजेश पाटील यांना पुन्हा धमकावत सदर इसमाने त्याच्या साथीदारांना घेऊन येण्याची धमकी दिली. काही वेळाने हा इसम त्याच्या तीन साथीदारांना घेऊन तेथे आला. या चौघांनी मिळून शाखाप्रमुख राजेश पाटील यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांचे कपडेही फाडून टाकले. या मारहाणीत शाखाप्रमुख राजेश पाटील यांच्या पायाला दुखापत झाली. या चौकडीने तेथून पळ काढल्यानंतर जखमी अवस्थेत शाखाप्रमुख राजेश पाटील यांनी केडीएमसीचे शास्त्रीनगर हॉस्पिटल गाठले. उपचारानंतर त्यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात जाऊन फरार चौकडीच्या विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिस फरार हल्लेखोर चौकडीचा शोध घेत आहेत.