
नागपूर : खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या बंदीवानाने कारागृहात आत्महत्या केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. श्यामराव ऋषीजी शेंडे (वय ४० रा. मुडझा, गडचिरोली) ,असे मृतकाचे नाव आहे.या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० साली श्यामराव याने शंकेतून केली. श्यामराव हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तो पत्नीला मारहाणही करायचा. २०२० मध्ये त्याने पत्नीचा खून केला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. ९ मे रोजी न्यायालयाने श्यामराव याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यावेळी तो चंद्रपूर कारागृहात होता. शिक्षा झाल्यानंतर १३ मे रोजी त्याला नागपूर कारागृहात आणण्यात आले. त्याला छोटी गोल परिसरातील शिक्षा झालेल्या बंदीवानांच्या बॅरेक चारमध्ये ठेवण्यात आले. सकाळी १० वाजताच्या सुमारास बराकीतून बाहेर येऊन तो रंगकामाच्या खोलीत गेला. तेथे खिडकीच्या लोखंडी सळाखीला त्याने पायजाम्याचा नाळा बांधून गळफास घेतला. ११ वाजताच्या सुमारास एक बंदीवान आंबे तोडण्यासाठी झाडावर चढला. त्याला खोलीतील खिडकीत बंदीवान गळफास लावलेला दिसला. त्याने आरडा-ओरड केली. या परिसरात तैनात सुरक्षा रक्षकाने कारागृहाच्या उपअधीक्षक दिपा आगे यांना माहिती दिली. आगे यांनी धंतोली पोलिसांना कळविले. माहिती मिळताच धंतोलीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या पथकाने कारागृहात पोहचून तपासणी केली. पंचनामा करून मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.