पत्नी सोडून गेली, सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओ, पोलिसांनी धाव घेत वाचवला तरुणाचा जीव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 10, 2023

पत्नी सोडून गेली, सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओ, पोलिसांनी धाव घेत वाचवला तरुणाचा जीव

https://ift.tt/IZVrXz3
‌म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचा लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या तरुणाचा तातडीने शोध घेऊन, त्याचे मतपरिवर्तन करण्याची मोलाची भूमिका भाईंदर पोलिसांनी नुकतीच पार पाडली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे या तरुणाचे प्राण वाचले आहेत. त्याला पुढील उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.वसईच्या नायगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची पत्नी कौटुंबिक कारणास्तव त्याला सोडून गेली आहे. यामुळे नैराश्यात गेलेल्या या तरुणाने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता तो भाईंदर-वसई खाडीवरील रेल्वे पुलावर गेला होता. यावेळी सोशल मीडियावरून लाइव्ह व्हिडीओ करत, पत्नीची समजूत काढूनही ती ऐकत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने सांगितले. या तरुणाने व्हिडीओमध्ये मुंबई पोलिसांनाही टॅग केले होते. मुंबई पोलिसांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन याची माहिती तत्काळ भाईंदर पोलिसांना दिली. भाईंदर पोलिसांनीही प्रसंगावधान दाखवून एक पथक तत्काळ खाडी पुलावर पाठवले. त्यांनी तरुणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने सुरुवातीला संवाद साधण्यास नकार दिला. मात्र, नंतर पोलिसांनी त्याची समजूत काढल्यावर त्याचे मतपरिवर्तन झाले. या तरुणाला घटनास्थळावरून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी तो नैराश्यामुळे मागील चार दिवसांपासून जेवला नसल्याने त्याची प्रकृती खालावल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे त्याला जवळच्या शासकीय पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती भाईंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी दिली.