
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : बिपर्जय वादळामध्ये मोठे नुकसान करण्याची क्षमता असून, गुजरातमधील कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगर जिल्ह्याला याचा फटका बसू शकतो. वादळामुळे विध्वंस होऊ शकतो, असा इशारा भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिला. अतिविध्वंसाची बिपर्जयची क्षमता कमी झाली असली तरी तीव्रता कायम आहे. आत्तापर्यंत सुमारे २१ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.‘गंभीर स्वरूपातील बिपर्जय चक्रीवादळ १५ जनूला संध्याकाळी गुजरातच्या जाखाऊ बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. या काळामध्ये ताशी १२५ ते १५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे किनाऱ्यातील परिसराचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. ‘गुजरातच्या कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर, पोरबंदर जिल्ह्यात १३ ते १५ जून या कालावधीमध्ये जोरदार पावसाचीही शक्यता आहे. सखल, किनारपट्टी भागांना पुराचा धोका आहे,’ असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले. राजकोट, मोरबी, जनुगडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये ताशी १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. या वाऱ्यांमुळे घरे, रस्ते, वीजवाहिन्या, दूरसंचार यंत्रणा, पिकांचे नुकसान होण्याची भीतीही वर्तवण्यात आली आहे. ‘सहा मीटर उंचीच्या भरतीच्या लाटांमुळे सौराष्ट्र आणि कच्छ किनाऱ्यावरील सखल भाग जलमय होण्याची शक्यता आहे. आम्ही या भागातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची शिफारस केली असून त्यानुसार पावले उचलली जात आहेत,’ असे मोहपात्रा म्हणाले.