
यवतमाळ : मृग नक्षत्र अवघ्या दोन दिवसांवर असल्याने शेतकऱ्यांकडून पेरणीसाठीची लगबग वाढली आहे. बियाणे खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. पण, प्रसिद्ध कंपन्यांचे बियाणेच मिळत नसल्याने अडचण वाढली आहे. चार पाकिटांची मागणी केली असता केवळ निम्मे दिले जात आहेत. हलक्या दर्जाचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रह धरला जात असल्याने साठेबाजीचा धोका व्यक्त होत आहे. यासंदर्भातील तक्रारी वाढत असल्याने सरकारने वेळीच उपाय योजण्याची मागणी जोर धरत आहे.मृग नक्षत्रात कापसाच्या पेरणीला सुरुवात होते. सिंचनाची सोय असलेले शेतकरी धूळपेरणी करतात. पावसाची वाटचाल समाधानकारक राहिल्यास कोरडवाहूतही पेरणी केली जाते. वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून शेतकरी आधीच बियाणे आणि खताची खरेदी सुरू करतात. केरळमध्ये मान्सूनची वाटचाल होऊ लागल्याने लगबग अधिकच वाढली आहे.यवतमाळ जिल्ह्याचा विचार करता ९ लाख २ हजार ७२ हेक्टरवर खरिपाचा पेरा होतो. यातील सर्वाधिक ४ लाख ५५ हजार क्षेत्र कापसाचे तर २ लाख ८६ हजार १४४ हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र आहे. कापसाचे क्षेत्र पाहता २२ लाख ७५ हजार पाकिट बियाण्यांची मागणी कृषी केंद्रचालकांनी नोंदविली आहे. बाजारात बियाणेही उपलब्ध आहेत. पण, शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या कंपन्यांचे बियाणे मिळत नाहीत. चार पाकिट मागताच केवळ दोन दिले जात आहेत. इतर दोन पॅकेट विशिष्ट कंपन्यांचे घ्यावे, असाही आग्रह होतो. यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात बियाण्यांचा तुटवडा झाल्यास शेतकरी तेलंगण सीमेवरील आदिलाबाद जिल्ह्यातून बियाणे खरेदी करून आणत असत. तिथेही प्रसिद्ध कंपन्यांचे बियाणे उपलब्ध होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेले पीक आणि सरकारकडून नवतंत्रज्ञानाला मान्यता देण्याविषयी चर्चा या बियाणे टंचाईसाठी कारणीभूत असल्याची माहिती कृषी साहित्याचे ठोक विक्रेते रमेश बुच यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.