म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : टोमॅटोला सध्या मिळत असलेला भाव चोरांच्याही नजरेतून सुटलेला नाही. त्यातूनच रग्गड, झटपट व हमखास कमाईसाठी चोरांनी वाशीच्या घाऊक बाजाराकडे मोर्चा वळवून चक्क टोमॅटोवर हात मारला. येथील एका व्यापाऱ्याच्या गाळ्यातून शुक्रवारी रात्री ७५ किलो टोमॅटोची चोरी करण्यात आली. संबंधित व्यापारी पोलिस तक्रार करण्याच्या विचारात आहे.भाजीपाला बाजारातील डी विंगमधील गाळा क्रमांक ५७६मध्ये टोमॅटोचा साठा होता. त्यातील तीन खोके (क्रेट) टोमॅटो शुक्रवारी रात्री चोरीस गेले. एका खोक्यामध्ये २५ किलो असे एकूण ७५ किलो टोमॅटो चोरण्यात आले. सध्या घाऊक बाजारात टोमॅटोला प्रति किलो १०० रु. भाव आहे. यानुसार व्यापाऱ्याचे सुमारे साडेसात हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. चोरीची ही घटना व्यापाऱ्याच्या गाळ्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामध्ये दोन जण टोमॅटोचे खोके चोरत असल्याचे दिसत आहे. व्यापारी शनिवारी सकाळी बाजारात आल्यावर ही घटना समोर आली. महिनाभरापूर्वी घाऊक बाजारात २० रु. किलो असणारा टोमॅटो सध्या १०० रु.वर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात त्याचा भाव १५० ते १६० रु. किलोपर्यंत वाढला आहे.