ठाणे: डोंबिवली पूर्वेतील एक महिला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास खिडकाळेश्वर मंदिरात गेली होती. दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी ती एका रिक्षात बसली. त्यात एक प्रवासी आधीच बसला होता. महिलेने रिक्षा चालकाला कोळेगावात जायचे असे सांगितले. परंतु रिक्षा चालकाने आणि पाठी बसलेल्या त्याचा साथीदाराने आपसात संगनमत करुन एका निर्जनस्थळी नेऊन रस्त्यावरच महिलेला धारधार शस्त्र दाखवत तिला निर्वस्त्र करत अतिप्रसंग करण्यास सुरू केला. मात्र याच वेळी रात्री गस्तीवर असणाऱ्या मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अतुल भोई आणि सुधीर हासे यांना रिक्षामध्ये दोन इसम एका महिलेवर रिक्षात बसून अतिप्रसंग करत असल्याचे संशय आला. त्यांनी मोटारसायकल रिक्षाच्या दिशेने फिरवली असता आरोपीनी रिक्षा पळवली. कोणीतरी आपला पाठलाग करत आहे, असे लक्षात आल्याने त्यांनी महिलेला चालत्या रिक्षातून खाली ढकलून देत फरार होण्याचा प्रयत्न केला. मात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही आरोपींना जागीच ताब्यात घेतले. प्रभाकर पाटील आणि वैभव तरे असे या दोन्ही रिक्षा चालकाची नावे असून हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहे. या दोघांनी पोलिसांकडून वाचण्यासाठी पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर ही शस्त्राचा हल्ला केला असून यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. सध्या मानपाडा पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत यांच्यावर विनयभंगसह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच अजून किती ठिकाणी अशा प्रकारच्या घटना यांनी केल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र रिक्षा चालकाच्या या घटनेनंतर डोंबिवली परिसरामध्ये रात्री प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.