
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: दहा दिवसांच्या ब्लॉकमुळे चर्चेत असलेल्या पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेच्या जोडकामाला सुरुवात झाली असून आज, शनिवारी सुमारे ५०० लोकल फेऱ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या ब्लॉककाळात २५६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून २५० लोकल फेऱ्या विलंबाने धावत आहेत. शुक्रवारी रेल्वे स्थानकांत चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली. यामुळे रेल्वे स्थानकातील प्रवासी गर्दी व्यवस्थापनासाठी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिसांचे (जीआरपी) एकूण ५३७ कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.खार ते गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेचे अन्य रेल्वे मार्गिकांना जोडण्याचे मुख्य काम गुरुवारी मध्यरात्रीनंतर सुरू झाले. शुक्रवारी सकाळी अपेक्षेप्रमाणे गर्दीच्या वेळी दररोजची लोकल पकडण्यासाठी प्रवासी स्थानकांत आले. फलाटांवर लोकल रद्द होण्याची उद्घोषणा होत असतानाच प्रवासी गर्दीत भर पडत गेली. अशातच विलंबाने आलेल्या लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आले. रेल्वे स्थानकातील गर्दी व्यवस्थापनासाठी , आरपीएफ आणि जीआरपी यांच्यात बैठक पार पडली. रेल्वे फलाट, पादचारी पूल आणि पायऱ्यांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे ३५९ आणि १७८ रेल्वे पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यात महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. गर्दी जमा होण्याच्या संभाव्य संवेदनशील ठिकाणी साध्या गणवेशात २४ तास सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, असे पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हींच्या माध्यमातून सर्व फलाट-पुलांवरील गर्दीवर नजर ठेवण्यात येत आहे. पायऱ्यांवर तसेच पुलांवर विनाकारण उभे राहण्यास मनाई केली आहे. आरपीएफच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना फलाटावर उपस्थित राहण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत.पर्यायी मार्गाचा वापर व्हावासहाव्या मार्गिकेच्या कामांमुळे शुक्रवारी २५६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. २५० लोकल विलंबाने धावल्या. शनिवारीही याचपद्धतीने पश्चिम रेल्वेवर लोकलचे वेळापत्रक असेल. ६ नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे अशाच पद्धतीने रेल्वे फेऱ्या रद्द राहणार आहेत. यामुळे आवश्यकता असेल तरच लोकलने प्रवास करावा आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गाने प्रवास करावा, असे आवाहन आरपीएफने केले आहे.अफवांवर विश्वास नकोमध्य-पश्चिम रेल्वेचे यात्री हे अधिकृत मोबाइल अॅप आहे. रद्द करण्यात आलेल्या लोकलचे वेळापत्रक मोबाइल अॅपवर देण्यात आले आहे. प्रवाशांनी घरातून बाहेर पडताना लोकलचे अद्ययावत वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे. रेल्वे स्थानक आणि समाजमाध्यमांवरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.Read And