
नवी मुंबई: सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने लग्न जुळविण्याच्या साईटवरून नवी मुंबईत राहणाऱ्या एका ३३ वर्षीय महिलेसोबत मैत्री वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी सिंगापूर येथे राहणाऱ्या व्यक्ती विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेतील पीडित महिला नवी मुंबईत राहण्यास असून मार्च २०२० मध्ये तिची लग्न जुळवणाऱ्या साईटवरुन सिंगापूर येथे राहणाऱ्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून आरोपी व्यक्तीने पीडित महिलेसोबत जवळीक वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपी व्यक्तीने पीडित महिलेला नवी मुंबई, मुंबई आणि सिंगापूर येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या दरम्यान आरोपींने महिलेचे फोटो आणि व्हिडिओ देखील काढल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सिंगापूरस्थित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२)(एन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.