
लातूर : लोकसभेचे कामकाज सुरू असताना आज काही तरुणांनी संसदेत तसेच संसदेच्या बाहेर जाऊन गोंधळ घातला. यातील एक तरुण हा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी गावाचा रहिवासी आहे. अमोल शिंदे असं तरुणाचं नाव आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस दल अमोलच्या घरी जाऊन अमोलची सखोल चौकशी करत आहेत. सैन्य भरती आणि पोलीस भरतीचं स्वप्न डोळ्यात ठेवून तो भरतीची तयारी करत होता. मात्र, त्याचं स्वप्न उध्वस्त होत गेलं आणि मनात व्यवस्थेबद्दल कधी चीड निर्माण झाली हे बहुधा त्यालाही समजलं नाही. आई वडिलांनी काबाड कष्ट करून लहानचा मोठा करत शिक्षणासाठी पैसा पुरवला. सुखाचे दिवस येथील असं वाटत असताना हा दिवस त्यांना पाहायला मिळाला. दरम्यान, घटनेनंतर अमोल शिंदे याच्या गावात एक पथकही या तरुणाच्या गावात पाठवण्यात आलं आहे. हे पोलिसांचे पथक गावात जावून त्याच्या कुटुंबियाची चौकशी करत आहेत. अत्यंत गरीब कुटुंबातील हा तरुण असल्याची माहिती समोर येत आहे. पण त्याने हे जे कृत्य केलं आहे, या बाबत गावातही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.या सर्व घटेनवर अमोल शिंदेच्या आई-वडिलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ''आम्हाला काहीच समजना झालं आहे. त्यांनं नेमकं केलं तरी काय आहे?. पोलीस सांगतात जाऊ नये तिथं गेला. पण आम्हाला काय कळत नाही. आमचा मुलगा सुखरूप आमच्या जवळ यावा बास्स... तो जर परत आला नाहीतर आम्ही पण मरतो'', असं म्हणत अमोलच्या आईच्या डोळ्यात अश्रू तरळले.पदवीपर्यंतचे अमोलचे शिक्षण झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तो पोलीस भरतीचीही तयारी करत आहे. त्याचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. आई वडील, दोन भाऊ मजुरी करत आहेत. अमोल देखील मिळेल ते काम करायचा, अशी गावात चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी तो येथून मुंबईला गेल्याची चर्चा देखील गावात आहे. पण पुढे तो कुठे गेला, तो कोणाच्या संपर्कात आला, याची माहिती मात्र कोणालाच नाही.