
म. टा. प्रतिनिधी, मुंबई:'विकसित भारतासाठी विद्यापीठे आणि शिक्षण प्रणालीही विकसित असणे आवश्यक आहे. मात्र अनेक विद्यापीठांत प्राध्यपकांची ५० टक्के पदेच भरली आहेत. अन्य प्राध्यापक तात्पुरत्या स्वरूपात नेमण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यापीठांतील रिक्त पदे भरण्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे', असे नमूद करत राज्यपाल यांनी राज्यपालांच्या अपुऱ्या संख्येच्या प्रश्नावर बोट ठेवले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'विकसित भारत @२०४७ : युवकांचा आवाज' या उपक्रमाचा सोमवारी शुभारंभ केला. यानिमित्ताने बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठांचे कुलगुरू, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापक यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना बैस यांनी विकसित राष्ट्रांच्या उभारणीत विकसित विद्यापीठांचे महत्त्व विषद केले.'जगात विकसित मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये सर्वोत्कृष्ट विद्यापीठे आणि संशोधन संस्था आहेत. त्यातूनच हे देश महान राष्ट्र झाले आहेत. मात्र, भारतातील विद्यापीठे जागतिक श्रेणीत येईपर्यंत आणि त्यामध्ये चांगले प्राध्यापक असेपर्यंत देश विकसित होऊ शकत नाहीत', याकडे लक्ष वेधले. त्यामुळे विद्यापीठे विकसित होण्यासाठी तेथील प्राध्यापकांची पदे पूर्ण भरली गेली पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.'सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची गरज''जगातील ५० सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये एकट्या अमेरिकेतील १७ विद्यापीठे आहेत. ब्रिटनमधील ६, हाँगकाँगमधील ४, ऑस्ट्रेलियातील ५ आणि अन्य विद्यापीठे ही फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या देशांमधील आहेत. ही विद्यापीठे आपल्या देशातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना आकृष्ट करीत आहेत. शिक्षणानंतर अनेक विद्यार्थी नोकरी, व्यवसायासाठी तेथेच थांबत आहेत. त्यातून प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे देशाबाहेर कायमस्वरूपी स्थलांतर होत आहे', असे राज्यपाल बैस यांनी सांगितले. त्यामुळे देशात सर्वोत्तम शैक्षणिक, संशोधन व व्यावसायिक संस्था उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले. Read And