
नागपूर: अधिवेशनादरम्यान सीताबर्डी आणि धंतोली परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना मुंज चौकातील मेट्रो स्टेशनवरून उडी घेत २४ वर्षीय युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या युवकाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम बन्नागरे (रा. तळेगाव, वर्धा, सध्या रा. अजनी) असे जखमी युवकाचे नाव आहे. शुभमचे वडील शिक्षक असून शुभम हा नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. गेल्या काही दिवसांपासून शुभम हा तणावात आहे. सोमवारी सायंकाळी तो मुंजे चौकातील मेट्रो स्टेशनमध्ये गेला. तेथून तो फुटओव्हर ब्रीजवर गेला. बँक ऑफ महाराष्ट्राकडे बघायला लागला. याच दरम्यान एका नागरिकाला तो दिसला. त्याने आरडा-ओरड करीत युवकाला थांबविण्याचा प्रयत्न केला. नागरिकाला काही कळायच्या आताच शुभमने उडी घेतली. ही घटना पाहणाऱ्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली. एका नागरिकाने धंतोली पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच धंतोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमीला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्या पायाला जबर मार लागल्याचे निदान डॉक्टरांनी केले. शुभमने उडी घेण्यापूर्वी सुमारे २५ वेळा वडिलांच्या मोबाइलवर संपर्क साधला. मी आत्महत्या करीत असल्याचे तो वडिलांना म्हणाला. वडिलांनी त्याची समजूतही घातली. मात्र शुभमने वडिलांचे ऐकले नाही. उडी घेण्यापूर्वी तो सरिता सरिता असे जोरजोराने ओरडत होता, असेही पोलिसांनी सांगितले. मात्र ही सरीता कोण याबाबत शुभमने पोलिसांना काहीही सांगितले नाही.