रंग, पिचकारी रस्त्यावर विखुरलेले, मद्यधुंद कारचालकाने कुटुंबाला चिरडलं; दोन लेकींसह आई-वडिलांचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 25, 2024

रंग, पिचकारी रस्त्यावर विखुरलेले, मद्यधुंद कारचालकाने कुटुंबाला चिरडलं; दोन लेकींसह आई-वडिलांचा मृत्यू

https://ift.tt/kXAEC6D
अमरावती : होळीच्या सणासाठी रंग, पिचकारी खरेदी करून गावाकडे दुचाकीवरून परत जाणाऱ्या कुटुंबाला भरधाव मद्यधुंद कारचालकाने चिरडले. या भीषण अपघातात दोन मुलींसह पती-पत्नी अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. मेळघाटच्या धारणी तालुक्यातील घुटी गावाजवळ रविवारी दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. आनंदाच्या सणाच्या दिवशीच अवघे कुटुंब या अपघाताने हिरावले. अपघातानंतर दुचाकीला बांधून असलेल्या पिशवीतील होळीसाठी खरेदी केलेले साहित्य रस्त्यावर विखुरलेले पाहून हळहळ व्यक्त झाली. दिनेश नंदलाल दारशिंबे, पत्नी शारदा आणि दोन मुली सर्व राहणार धोधरा (धारणी) अशा चौघांचा या अपघातातील मृतांमध्ये समावेश आहे. मेळघाटातील आदिवासी संस्कृतीत होळीला विशेष महत्व आहे. म्हणून दारशिंबे कुटुंब गावावरून सकाळीच खरेदीसाठी धारणीला आले. साऱ्यांसाठी त्यांनी नवीन कपडे खरेदी केले. किराणा, मुलींसाठी आवश्यक रंग व इतर साहित्य घेऊन परत गावाकडे निघाले. घुटीच्या पुढे टिटम्बा रस्त्यावरून जात असताना एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला अचानक मागून धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, चौघेही रस्त्यावर पडले. कारने या चौघांनाही चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच धोदरासह परिसरातील गावकरी धावून आले. या घटनेने धोधरा, रबांग, घुटी, मांडू, बिबामल, सावऱ्या, कासमार, खिडकी, टिटम्बा आणि कवडाझरी अशा १० गावांतील होळीचा आनंद हिरावला गेला आहे. पोलिसांनी कारचालक अतुल कास्देकर रा. शिरपूर याला अटक केली आहे.