
म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्यात प्रथमच पाच टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीत पुण्यातील मतदारसंघांचे दोन टप्प्यांत विभाजन झाले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघासाठीचे मतदान सात मे रोजी, तर उर्वरित पुणे, शिरूर, मावळ या मतदारसंघांसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे, आगामी दोन महिन्यांत पुणे जिल्ह्यात चौकाचौकांत केवळ निवडणूक आणि राजकारण याचीच चर्चा रंगणार आहे.पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये आत्तापर्यंत कायमच एकाचवेळी मतदान होत आले आहे. या वेळी ही परंपरा मोडली असून, बारामतीची निवडणूक सर्वांत आधी होणार आहे. मराठवाड्याचा काही भाग, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघ आणि कोकण पट्ट्यातील दोन मतदारसंघांसोबत या वेळी बारामती मतदारसंघ जोडण्यात आला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात १२ एप्रिलला या मतदारसंघांतील निवडणुकीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बारामती मतदारसंघातील लढतीकडे सध्या सर्वांचेच लक्ष लागले आहेत.पुणे जिल्ह्यातील उर्वरित तिन्ही मतदारसंघांसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीची निवडणूक प्रक्रिया आणखी महिनाभराने म्हणजे १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पुणे लोकसभेच्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाने मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर केले आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच भाजपने पुण्यासाठी उमेदवार जाहीर केल्याने त्यांना प्रचाराला अधिक कालावधी मिळणार आहे. मावळ आणि शिरूर या दोन मतदारसंघांसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे.