डाव्यांचा गुजरातला तडाखा... दिल्लीने तुफानी फटकेबाजीच्या जोरावर साकारला दमदार विजय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 25, 2024

डाव्यांचा गुजरातला तडाखा... दिल्लीने तुफानी फटकेबाजीच्या जोरावर साकारला दमदार विजय

https://ift.tt/YhEe2S6
नवी दिल्ली : ऋषभ पंतच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला गुजरात टायटन्सवर विजय मिळवता आला. पंत आणि अक्षर पटेल या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजीची हवाच काढली. या दोघांनीही दमदार अर्धशतके झळकावली आणि या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजीचा फटका गुजरातच्या संघाला बसला. दिल्लीने पंत आणि अक्षर यांच्या फटकेबाजीच्या जोरावर २२४ धावांचा डोंगर रचला होता. या आव्हानाचा चांगला पाठलाग गुजरातने करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांना हा सामना जिंकता आला नाही. रशिद खानने अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना खेचला होता, पण दिल्लीने चार धावांनी विजय साकारला. दिल्लीचा हा या हंगामातील ९ व्या सामन्यांतील चौथा विजय ठरला.दिल्लीच्या २२५ धावांचा सामना करण्यासाठी गुजरातचा संघ मैदानात उतरला खरा, पण कर्णधार शुभमन गिलच्या रुपात त्यांना पहिला धक्का बसला. गिलला यावेळी फक्त सहा धावा करता आल्या. गिल बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या साई सुदर्शनने दिल्लीच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले. साईने यावेळी वृद्धिमान साहाच्या साथीने संघाला ९५ धावांपर्यंत मजल मारून दिली. पण त्यावेळी साहा ३९ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटला. पण त्यानंतर साई आणि डेव्हिड मिलर यांची चांगली जोडी जमेल असे वाटत होते. कारण साई धडाकेबाज फटकेबाजी करत होता आणि त्याचे अर्धशतकही झाले होते. त्यामुळे हे दोघे संघाला विजय मिळवून देतील, असे वाटत होते. पण यावेळी साई बाद झाला आणि गुजरातला मोठा धक्का बसला. साईने यावेळी ३९ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटाकारांच्या जोरावर ६९ धावा केल्या. साई बाद झाला आणि त्यानंतर गुजरातचे अजून दोन फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे गुजरातच्या विजयाची आशा यावेळी डेव्हिड मिलरवर होती. मिलरने अर्धशतकी पूर्ण केले. पण अर्धशतक झळकावल्यावर मिलर जास्त काळ टिकू शकला नाही आणि दिल्लीच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. मिलरने यावेळी २३ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५५ धावा केल्या. दिल्लीच्या संघाची सुरुवात चांगली झाली नसली तरी त्यांचा प्रयोग यावेळी चांगलाच यशस्वी ठरला. दिल्लीच्या संघाने अक्षर पटेलला तिसऱ्या स्थानावर बढती दिली आणि त्याने या संधीचे सोने केले. अक्षरने यावेळी दिल्लीचा डाव तर सावरलाच पण अर्धशतकही पूर्ण केले. अक्षरने यावेळी ४३ चेडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६३ धावा केल्या. अक्षर बाद झाला तेव्हा पंतचे अर्धशतकही झाले नव्हते. पण पंतने अखेरच्या षटकात तुफानी फटकेबाजी केली आणि दिल्लीच्या संघाला २०० धावांचा पल्ला ओलांडून दिला. पंतने यावेळी ४३ चेंडूंत पाच चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर नाबाद ८८ धावांची खेळी साकारली. पंतला अखेरच्या षटकांमध्ये स्ट्रिस्टन स्टब्सने ७ चेंडूंत नाबाद २६ धावा करत चांगली साथ दिली.गुजरातकडून यावेळी मोहित शर्मा हा चांगलाच महागडा ठरला. मोहितने यावेळी ४ षटकांत एकही विकेट न मिळवता ७३ धावा दिल्या. आयपीएलच्या इतिहासात एवढ्या धावा एका षटकात कोणत्याही गोलंदाजाने दिल्या नव्हत्या.