
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये दोऱ्याला लटकवलेला खेकडा दाखवून त्याचा गैरवापर केल्याबद्दल ‘पेटा इंडिया’ संस्थेने (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स) आक्षेप घेतला आहे. या संदर्भात रोहित पवार यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे पत्र ‘पेटा’ने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांना पाठविले आहे.एवढंच नव्हे, तर पशुवैद्यकीय सेवा आणि पुन्हा निसर्गात पुनर्वसन करण्यासाठी खेकड्याला आमच्याकडे सुपूर्द करण्याची विनंतीही ‘पेटा’ने पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्र आदर्श आचारसंहिता, मुख्य निवडणूक कार्यालयाने निवडणूक प्रचारासाठी प्राण्यांचा वापर करण्यास मनाई असल्याचा आदेश २४ मार्च २०२४ रोजी काढला आहे. आदर्श आचासंहितेबाबत निवडणूक आयोगाची नियमावली आणि १९ सप्टेंबर २०१२ रोजी भारत निवडणूक आयोगाने जारी केलेले पत्र; तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० (प्रिव्हेंशन ऑफ अॅनिलम क्रूएल्टी अॅक्ट) यांचे रोहित पवार यांनी उल्लंघन केले असल्याचा ‘पेटा इंडिया’चा आक्षेप आहे.रोहित पवार यांनी खेकड्याचा केलेला वापर हा पूर्वनियोजित असल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे. प्रसिद्धीसाठी प्राण्याला विनाकरण दुखावले गेले. त्याला त्रास देण्यात आला, हे गैरप्रकार थांबविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे ‘पेटा इंडिया’चे कायदेविषयक सल्लागार विभागाचे शौर्य अग्रवाल यांनी शरद पवार आणि मीनल कळसकर यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.