मित्र पोहण्यासाठी गेले, पाच जणांनी नदीत उडी घेतली, मात्र तिथेच अनर्थ घडला, दोघांचा दुर्दैवी मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 21, 2024

मित्र पोहण्यासाठी गेले, पाच जणांनी नदीत उडी घेतली, मात्र तिथेच अनर्थ घडला, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

https://ift.tt/7Du4YFe
रत्नागिरी: खेड तालुक्यातील तुंबाड येथे पोहायला गेलेले पाच जण बुडाल्याची घटना आज २० मे रोजी घडली. यातील तिघांना वाचविण्यात यश आलं असून दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. सौरभ हरिश्चंद्र नाचरे (१९), अंकेश संतोष भागणे (२०) अशी दोघा मृतांची नावं आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सौरभ, अंकेश, यांच्यासह अभय पांडुरंग भागणे, महेश मारुती गमरे, मयंक प्रकाश बाणाईत असे पाच जण तुंबाड इथल्या नदीवर पोहायला गेले होते. अंकेश संतोष भागणे हा बहिरवली येथील असून सौरभ नाचरे हा आपल्या आजोळी बहिरवली येथे आला होता. या सगळ्या अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेने बहिरवली तसेच पन्हाळजे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पाचही जणांनी नदीत पोहण्यासाठी नदीमध्ये उड्या मारल्या. भरतीची वेळ असल्याने या पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पाचही जण गटांगळ्या खाऊ लागले. या दरम्यान तेथे एका मासेमारी करणाऱ्या नावाड्याने तिघांना वाचवले. परंतु सौरभ आणि अंकेश हे भरतीच्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने ते बोटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. स्थानिक ग्रामस्थांनी नंतर त्या दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. या घटनेची माहिती समजताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान मृत सौरभ हा वायरमन म्हणून काम करत होता, तर अंकेश भागणे मुंबई येथे एका बेकरीमध्ये कामाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे या दोघांची अधिक माहिती मिळू शकली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे पन्हाळजे - बहिरवली पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. उन्हाळी सुट्टीमुळे परगाव वरून अनेक जण या ठिकाणी सुट्टीची मजा लुटण्यासाठी आलेली आहेत. परंतु आपण नवख्या ठिकाणी आल्यानंतर नदीच्या प्रवाह, नदीची खोली या संदर्भात अधिक माहिती नसल्यास पोहताना काळजी घ्या, असे आवाहन खेड पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी केले आहे.