
गोपाळ गुरव : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या सक्रिय फुटबॉलपटूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुनील छेत्रीने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली. भारतीय फुटबॉलमधील ‘सचिन तेंडुलकर’ म्हणूनही काही जण छेत्रीचा उल्लेख करतात. छेत्री सहा जून रोजी कुवेतविरुद्ध अखेरचा सामना खेळून फुटबॉलला गुडबाय म्हणणार. गेली १९ वर्षे छेत्री भारताकडून फुटबॉल खेळत होता. त्यामुळे त्याच्यासाठी निवृत्तीचा निर्णय सोपा नव्हता. मात्र, त्याने हा निर्णय घेतला तो भारताच्या एका महान फलंदाज आणि माजी कर्णधाराशी संवाद साधल्यानंतर.छेत्रीने २००५मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो भारताकडून १५० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आणि ९४ आंतरराष्ट्रीय गोलही केले. ३९ वर्षीय छेत्रीच्या निवृत्तीबाबत नेहमीच चर्चा होत होती. आता कोलकात्यात तो फुटबॉलला अलविदा करणार आहे. गुरुवारी त्याने सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर केली. मात्र, त्या आधी छेत्रीने आपल्या जवळच्या मित्राशी संवाद साधला. त्याचा हा मित्र दुसरा-तिसरा कोणी नसून भारताचा आक्रमक फलंदाज आहे. छेत्रीने कोहलीशी चर्चा करूनच निवृत्ती जाहीर केली.छेत्रीने शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. छेत्री म्हणाला, ‘निवृत्तीचा निर्णय घेण्यापूर्वी मी कोहलीशी चर्चा केली. तो माझा जवळचा मित्र आहे. तो मला चांगल्या प्रकारे समजू शकतो. खेळात चढ-उतार सुरू असतात. निवृत्ती हा खेळाचा भागच आहे. म्हणूनच मला कोहलीशी याबाबत चर्चा करावीशी वाटली.’त्यापूर्वी कोहलीनेही सोशल मीडियावरून छेत्रीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘छेत्री हा महान खेळाडू आहे. निवृत्तीपूर्वी त्याने मला संदेश पाठविला होता. निवृत्तीच्या निर्णयाने तो समाधानी असेल. आम्ही दोघे घनिष्ठ मित्र आहोत. माझ्याकडून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. ती खूपच प्रेमळ व्यक्ती आहे,’ असे ट्वीट कोहलीने केले आहे. छेत्री आणि कोहली नेहमी एकमेकांच्या संपर्कात असतात. एकमेकांना विनोदी मेसेज पाठवित असतात.२०१८च्या हिरो कपच्या वेळीही छेत्रीने चाहत्यांना भारतीय फुटबॉलला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्या वेळी कोहली त्याच्या पाठीशी उभा राहिला होता. छेत्रीच्या वाढदिवसाला कोहलीने स्टेटसही ठेवतो. आता सोशल मीडियावर त्यांचे मैत्रीचे किस्सेही शेअर केले जात आहेत.