कोल्हापुरात प्रचार थांबला, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, मतदारांचा कौल कुणाला? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 7, 2024

कोल्हापुरात प्रचार थांबला, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, मतदारांचा कौल कुणाला?

https://ift.tt/0r5v2En
कोल्हापूर: कोल्हापूरसह ११ लोकसभा मतदारसंघात प्रचाराचे तोफ शांत झाल्यानंतर उद्या प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. महाविकास आघाडीसह महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेषतः कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यात जो प्रचार रंगला त्यात केवळ शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. महाविकास आघाडीने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिल्याने महायुतीच्या नेत्यांची मोठी अडचण झालेली प्रचार काळात पाहायला मिळाली. विकास कामांपेक्षा वैयक्तिक पातळीवर जाऊन महायुतीच्या उमेदवारांसह अनेक नेत्यांनी शाहू महाराजांवर टीका केली. या टीकेला महाविकास आघाडीतील नेत्यांनी ही जोरदार प्रत्युत्तर दिलं खरं, मात्र या घडामोडीनंतर जनता आपला कौल नेमका कुणाला देणार, याची उत्सुकता प्रत्येक राजकीय नेत्याला लागून राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या राजकीय भूकंपानंतर पहिल्यांदा लोकसभा निवडणुका पार पडत आहेत. महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्याचं मतदान पार पडला असून तिसऱ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान उद्या पार पडत आहे. ही निवडणूक प्रत्येक पक्षाला प्रतिष्ठेची झाली आहे. यंदाच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चिती, हाच एक मोठा उत्सुकतेचा पण घोळ असलेला प्रकार दिसून येत आहे. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंसोबत गेल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने आपला दावा सांगत ही जागा आपल्याकडे ओढून घेतली. शिवाय शरद पवार यांनी मोठी खेळी करत या जागेवरून शाहू महाराज छत्रपती यांना रिंगणात उतरवलं. यामुळे महायुतीमधील कार्यकर्त्यांसह नेतेमंडळींना थेट शाहू महाराजांवर टीका करणे आणि शाहू महाराजांविरोधात प्रचार करणे हे गेल्या काही दिवसात अडचणीचे झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. महायुतीमधील नेत्यांनी शाहू महाराज छत्रपती हे आमचे आदराचे स्थान आहेत. त्यामुळे त्यांनी राजकारणात आणि निवडणूक रिंगणात उतरू नये, अशी विनंती केली होती. मात्र लोकशाही वाचवण्यासाठी आणि गढूळ झालेलं वातावरण दूर करण्यासाठी तसेच शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार संसदेत पोहोचावा यासाठी शाहू महाराजांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. छत्रपती घराण्याचा सन्मान महाविकास आघाडीने काँग्रेसच्या तिकिटावर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात आली कोल्हापूरची गादी, छत्रपती घराणे, पुरोगामी चेहरा, भाजपने गेल्या दहा वर्षात केलेल काम अशा मुद्द्यांवर काँग्रेस कडून प्रचार सुरू आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू महाराज हे छत्रपती घराण्याचे थेट वंशज नाहीत, तसेच ते मूळचे कोल्हापूरचे नाहीत, अशी विधाने करून खळबळ उडवून दिली. मात्र याला देखील महाविकास आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर देत संजय मंडलिक यांनी छत्रपती घराण्याचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागावी, असे सतेज पाटील म्हणाले. दरम्यान प्रत्येक सभेमध्ये महायुतीच्या उमेदवारांकडून संभाजीराजे छत्रपती, शाहू महाराज यांच्यावर वारंवार टीका करण्यात येत होती. यामुळे आक्रमक झालेले संभाजी राजे छत्रपती यांनी थेट महाविकास आघाडीच्या शिवशाहू निर्धार सभेत विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ७ तारखे नंतर देऊ असा इशारा दिला. महायुतीकडून करण्यात येत असलेल्या छत्रपती घराण्यावरील वैयक्तिक टीका या कोल्हापुरातील अनेक शिवशाहू प्रेमींना रुचलेली नाही. हे वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत होते. अशातच कोल्हापुरात मान गादीला पण मत मोदींना हा ट्रेंड रुजवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. मात्र महायुतीने देखील मान गादीला आणि मत देखील गादीला हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सोशल मीडियासह प्रत्येक भाषणातून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे कोल्हापुरातून शाहू महाराज आणि संजय मंडलिक दोघांपैकी जनता आपला कौल कोणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.