
नांदेड: जिल्ह्यात झालेल्या एका भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी आढळून पती पत्नी आणि पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला. नांदेड - बिदर राष्ट्रीय महामार्गावरील बहिरापूर जवळ गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. मोहसीन गणीसाब शेख (३०), फरिदा मोसीन शेख (२८) आणि जुनेद मोसिन शेख (५) असं मृतकाच नाव आहे. एकाच कुटुंबियांतील तिघांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत कुटुंबीय हे मुखेड तालुक्यातील परतूर येथील रहिवासी आहेत. कामा निमित्त गुरुवारी दुपारी मोहसीन गणीसाब शेख हे पत्नी आणि पाच वर्षाच्या मुलासोबत दुचाकीने मुखेडकडून मुक्रमाबादकडे जात होते. यावेळी नांदेड बिदर मार्गावरील बिहारीपूर येताच त्यांची दुचाकी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळली. अपघात एवढा भीषण होता की, घटनेनंतर तिघेही रस्त्याच्या कडेला पडले. डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले. मोहसीन गणीसाब शेख, फरिदा मोसीन शेख आणि पाच वर्षीय जुनेद मोसिन शेख या तिघांचा मुक्रमाबाद येथे रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मुक्रमाबाद येथील आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळाला मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी तत्काळ भेट देऊन पाहणी केली. नेमका अपघात कशामुळे झाला याचा शोध मुक्रमाबाद पोलीस घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान या दुर्देवी अपघातात एकाच कुटुंबियांतील तिघांचा मृत्यू झाल्याने मुखेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.