Lok Sabha Elections 2024: चौथा टप्पा ५२ टक्क्यांचा! सर्वाधिक मतदान नंदुरबार, तर सर्वांत कमी शिरूरमध्ये - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 14, 2024

Lok Sabha Elections 2024: चौथा टप्पा ५२ टक्क्यांचा! सर्वाधिक मतदान नंदुरबार, तर सर्वांत कमी शिरूरमध्ये

https://ift.tt/RWYjdlO
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यात सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ५२.४९ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात अतिशय धीम्या गतीने सुरू झालेल्या मतदानाला दुपारनंतर थोडी गती मिळाली. मात्र, गेल्या तीन टप्प्यांप्रमाणेच चौथ्या टप्प्यातही जेमतेमच मतदान झाल्याचे दिसते.राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पुणे विभागातील एकूण अकरा मतदारसंघांमध्ये सोमवारी सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. सर्वच ठिकाणी सकाळच्या सत्रात मतदान संथ होते. पहिल्या चार तासांत म्हणजेच सकाळी ११ वाजेपर्यंत केवळ १७.५१ टक्केच मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर मतदानाला गती मिळाली. दुपारी १ वाजतापर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले. त्यानंतरही हा वेग कायम राहिला आणि सायंकाळी ५ वाजतापर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. अकरा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदान नंदुरबारमध्ये ६०.६० टक्के, तर सर्वांत कमी शिरूरमध्ये ४३.८९ टक्के इतकेच मतदान झाले.या टप्प्यात जालन्यातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे पाटील यांच्याविरोधात नीलेश लंके, शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिवाजीराव आढळराव-पाटील, पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी दुहेरी लढत, तर औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील, संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे अशी तिरंगी लढत झाली.खान्देशात उत्साहजळगाव : खान्देशात नागरिकांनी उत्साह दाखवल्याने मतटक्का उंचावल्याचे पाहायला मिळाले. नंदुरबारमध्ये राज्यातील सर्वाधिक ६० टक्क्यांवर मतदान झाले, तर जळगाव ५१.९८, रावेर मतदारसंघात ५५.३६ टक्के मतदान झाले. ही आकडेवारी सायंकाळी पाचपर्यंतची असून, सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मतटक्का आणखी वाढण्याची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्रात मतटक्का घसरलापुणे : ‘पुण्याचा खासदार कोण’ अशी गेल्या दीड महिन्यांपासून शहरातील विविध कट्ट्यावर चर्चा रंगली. अखेर त्यासाठी सोमवारी मतदानही झाले. पुण्यात सायंकाळी ६ वाजतापर्यंत सुमारे ५०.५० टक्के मतदान झाले. प्रतिष्ठेच्या ठरलेल्या शिरूर लोकसभेसाठी सुमारे ४७.५० टक्के आणि मावळ लोकसभेसाठी सुमारे ५२.३० टक्के इतके मतदान झाले. गेल्या निवडणुकीवेळच्या तुलनेत यंदा पुण्यात मतदानाचा टक्का वाढला आहे. शिरूर आणि मावळचा टक्का घसरल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले. पुण्यातून मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, शिरूरमधून अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव आणि मावळमधून संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यापैकी लोकसभेवर कोण जाणार याची उत्सुकता आता चार जूनपर्यत कायम राहणार आहे. मराठवाड्यात ६२ टक्के मतदानछत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), जालना व बीड लोकसभा या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान झाले. यंत्र नादुरुस्तीच्या काही घटना; तसेच शाई पुसण्याचा काही युवकांनी केलेला प्रयत्न असे प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. या तिन्ही मतदार संघातसरांसरी ६२ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले असून, अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत हाती येईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. या तिन्ही मतदारसंघांत एकूण १०४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून यापैकी मतदारांचा कौल कोणाला मिळणार हे पाहण्यासाठी चार जूनपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.नगरमध्ये पैसेवाटपाच्या तक्रारीनगर : अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघांत निवडणूक आयोगाची मतदानप्रक्रिया सुरळीत पार पडली. मात्र, उमेदवारांमधील चुरस आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप शेवटपर्यंत सुरूच होते. त्यातूनच काही ठिकाणी पैसे वाटपाच्या, तर नगर शहरात अल्पसंख्याक मतदारांची फसवणूक करून त्यांच्या बोटाला शाई लावून मतदानापासून वंचित ठेवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. अहमदनगरमध्ये सायंकाळी पाचपर्यंत ५३.२७ टक्के, तर शिर्डीत ५५.२७ टक्के मतदान झाले होते. पारनेर तालुक्यात सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. महायुतीचे डॉ. सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांच्यात लढत झाली, तर शिर्डीत महायुतीचे सदाशिव लोखंडे, महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांच्यात लढत झाली. देशात ६३ टक्के मतदाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी महाराष्ट्रासह ९ राज्ये आणि जम्मू-काश्मीरमधील ९६ जागांवर मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीचा कल कायम राहिला. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रात्री ८ वाजता मिळालेल्या माहितीनुसार, चौथ्या टप्प्यात देशात सरासरी ६३ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात सुमारे ५२.७५ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७६.०५ टक्के, तर जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वात कमी ३६.७३ टक्के मतदान झाले. निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगाल, बिहारमध्ये वेगवेगळ्या घटनांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील अनेक राज्यांत उन्हाळ्याची तीव्र लाट कायम आहे. चौथ्या टप्प्यात मतदान झालेल्या बहुतांश राज्यांतही तीव्र उन्हामुळे सकाळी व दुपारी मतदानाचे प्रमाण कमीच होते. दुपारनंतर अनेक केंद्रांबाहेर रांगा लागल्याचे सांगण्यात येते.