
नागपूर: इस्रायल-हमास युद्धात भारतीय लष्करातील माजी कर्नल वैभव काळे हे यूएनच्या वाहनातून रफाहला जात असताना मिसाईल वाहनावर आदळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी काळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात रुजू झाले होते. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आंतरराष्ट्रीय व्यक्तीचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. वैभव काळे यांचे भारतीय भवन्स विद्यामंदिरात शालेय शिक्षण झाले आहे. वैभव काळे हे एनडीए आणि नंतर आयएमएच्या माध्यमातून सैन्यात दाखल झाले. ११ जम्मू काश्मीर रायफल्स अंतर्गत विविध आघाड्यांवर काम केले. २२ वर्षांच्या सेवेनंतर २०२२ मध्ये त्यांनी लष्करातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी दोन वेगवेगळ्या खासगी कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर काम केले. पण त्यांनी त्या नोकऱ्या सोडल्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या अधिपत्याखाली 'यूएनडीएसएस' मध्ये सेवा द्यायला सुरुवात केली.युनायटेड नेशन्समध्ये सामील झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग गाझा येथील रफाह येथे झाली. ४६ वर्षीय वैभव १२ एप्रिल रोजी निरीक्षक पदावर रुजू झाले. नुकतेच इस्रायलने हमासचा खात्मा करण्यासाठी रफाह हल्ला करण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत ते गेल्या अनेक दिवसांपासून रफाहवर मिसाईल्सने हल्ला केला. सोमवारी काळे हे त्यांच्या इतर साथीदारांसह संयुक्त राष्ट्राचा झेंडा घेऊन पांढऱ्या वाहनातून रफाह येथील युरोपियन रुग्णालयाकडे जात होते. दरम्यान, इस्रायलकडून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र काळे यांच्या वाहनावर पडल्याने ते जागीच ठार झाले. तर दुसरा साथीदार गंभीर जखमी झाला. संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते फरहान हक यांनीही याला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यावर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिया गुटेरेस यांनी ट्विट केले की, "आज गाझामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या वाहनावर हल्ला झाला, त्यात आमचा एक सहकारी ठार झाले आणि दुसरा जखमी झाला. गाझामध्ये १९० हून अधिक यूएनचे कर्मचारी मारले गेले.