
मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे, अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, याचा सर्वात मोठा फटका हा मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनला बसल्याच पाहायला मिळत आहे. सकाळच्या सुमारास मुंबईतील मध्य रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली होती. मध्य रेल्वेवरील कुर्ला आणि सायनदरम्यानच्या अप-फास्ट आणि डाउन-फास्ट लोकल सकाळी ११.२५ पासून बंद ठेवण्यात आली होती तर त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी ११.४५ पासून स्लो लोकल सेवाही स्थगित करण्यात आली होती. अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या, दरम्यान आता प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे, मात्र आता काही प्रमाणात रेल्वे सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. मात्र जरी लोकल पुन्हा सुरू झाली असली तरी देखील ट्रॅकवर साचलेल्या पाण्यांमुळे अडथळा निर्माण होत असून, अजूनही ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलेलंच आहे.
कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी
मुंबई आणि उपनगरामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मुंबईच्या कुर्ला आणि सायन स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल आणि एक्सप्रेस खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे, मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून येणाऱ्या लोकल रद्द केल्यानं कल्याणच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशी अडकून पडले आहेत, दरम्यान आता पुन्हा एकदा लोकल सुरू झाली आहे, मात्र वेळापत्रक अजूनही विस्कळीतच आहे, त्यामुळे कल्याणच्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी गर्दी केली आहे.
दरम्यान दुसरीकेड दादरहून बदलापूरडे धीमी लोकल रवाना झाली आहे, मात्र सायन रेल्वे ट्रॅक अजूनही पाण्याखालीच आहे. बदलापूर लोकल मागील 1 तासांपासून सायन आणि कुर्लाच्या मध्येच अडकल्यानं या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
लांब पल्ल्यांच्या ट्रेनलाही फटका
सतत पडणाऱ्या पावसाचा फटका हा मुंबईतील लोकल प्रमाणेच लांब पल्ल्यांच्या रेल्वेला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. ज्याप्रमाणे मुंबई, ठाणे रेल्वे स्थानकात लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची गर्दी पाहयला मिळत आहे, त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा देखील चांगलाच खोळंबा झाला आहे. पावसामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं असून, गाडी नेमकी कधी येईल याची कोणतीच माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली जात नसल्यानं रेल्वे प्रवाशी चांगलेच संतप्त झाले आहेत.
दुपारपासून हे रेल्वे प्रवासी आपल्या गाडीची वाट पाहत आहेत. गाडीची नियोजित वेळ उलटून गेल्यानंतर देखील अनेक तासांपासून हे प्रवाशी रेल्वे स्टेशनमध्येच अडकले आहेत. मात्र ट्रेन कधी येणार याची योग्य माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली जात नसल्याचं या प्रवाशांचं म्हणणं आहे.
तसेच ज्या गाड्यांची वेळ संध्याकाळची होती, त्या गाड्या रात्री उशिरानंतर सोडण्यात येणार असल्याचे सांगितले जातं आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात लांब पल्ल्यांच्या रेल्वेंनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी केरळला निघालेले काही विद्यार्थी देखील इथे अडकून पडले आहेत.