
या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैना याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरेश रैना ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयच्या निशाण्यावर आला आहे. ईडीने सुरेश रैनाला समन्स बजावलं आहे. त्यानुसार सुरेश रैनाची बुधवारी 13 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. सुरेश रैना याला एका बेटिंग ॲपचा प्रचार केल्याबद्दल ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीने काही महिन्यांपूर्वी बंदी घातलेल्या बेटिंग वेबसाइट आणि ॲप्सचा प्रचार केल्याबद्दल अनेक सेलिब्रिटींना नोटीस पाठवली होती. यात सुरेश रैना याचंही नाव होतं.
रिपोर्ट्सनुसार, रैनावर एका बेटिंग ॲपचं प्रचार केल्याचा आरोप आहे. डिसेंबर 2024 मध्ये 1xBet या बेटिंग ॲपने रैनाला ब्रँड ॲम्बेसेडर केलं होतं. केंद्र सरकारकडून 1xBet, Parimatch यासह अनेक ॲप आणि बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. मात्र त्यानंतरही हे सर्व ॲप्स आणि वेबसाइट वेगवेगळ्या नावांनी कार्यरत आहेत. तसेच जाहीराती केल्या जात आहेत. रिपोर्ट्सनुसार, सेलिब्रिटी प्रमोशन करत असल्याने या बंदी घातलेल्या ॲप्स आणि वेबसाईटला प्रसिद्धी मिळते. या प्रकरणात रैनाचं नाव समोर आलंय. रैनानेही याचं प्रमोशन केलं होतं. त्यामुळे रैनाला बुधवारी 1xBet संदर्भात चौकशी केली जाणार आहे.
ईडीने रैनाआधी गेल्या महिन्यात भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि युवराज सिंह या दोघांनाही बेटिंग ॲप्सचं प्रमोशन केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती. सोशल मीडियावर हे आजी माजी खेळाडू विविध ॲप्सचं प्रमोशन करत असतात.
सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल कारकीर्द
दरम्यान सुरेश रैना याने टीम इंडियाचं टी 20i, वनडे आणि कसोटी या तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. रैनाने 18 कसोटी, 226 एकदिवसीय आणि 78 टी 20i सामने खेळले आहेत. रैनाने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 768, 5615 आणि 1604 धावा केल्या आहेत. तसेच रैनाने कसोटीत 13, वनडेत 36 आणि टी 20i मध्ये 13 विकेट्सही घेतल्या होत्या.