
आयसीसीने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा बुधवारी क्रमवारी (Icc Ranking) जारी केली आहे. या आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडियाचा आणि खेळाडूंचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. भारताच्या अनेक खेळाडूंनी आपलं स्थान कायम राखलंय. तर काही खेळाडूंनी आपलं स्थान सुधारलं आहे. त्यामुळे आयसीसी रँकिंगमध्ये भारताच्याच खेळाडूंना आपल्या सहकाऱ्यांपासून धोका आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारताचे खेळाडू रँकिंगमध्ये कोणत्या स्थानी आहेत? हे सविस्तर जाणून घेऊयात.
भारताचा युवा आणि विस्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आपला दबदबा कायम राखला आहे. अभिषेक फलंदाजांच्या टी 20i रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. तसेच वनडे रँकिंगमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला चांगलाच फायदा झाला आहे. रोहित शर्मा याने पाकिस्तानच्या बाबर आझम याला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र अभिषेक याचं अव्वल स्थान सहकारी खेळाडूमुळेच धोक्यात आलं आहे. तो खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
तिलक वर्मामुळे अभिषेकला धोका
भारताचा युवा आणि स्फोटक फलंदाज गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मात्र त्यानंतरही तिलकने टी 20i रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. तिलक दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. अभिषेक आणि तिलक या दोघांच्या रेटिंमध्ये मोजून 25 रेटिंगचा फरक आहे. अभिषेकच्या खात्यात 829 तर तिलकच्या नावावर 804 रेटिंग आहेत.
अभिषेक आणि तिलक ही जोडी लवकरच आशिया कप स्पर्धेत खेळताना दिसू शकते. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत निवड झाल्यास अभिषेकसमोर अव्वल स्थान कायम राखण्यासाठी चमकदार कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला तिलकचं अभिषेकला पछाडत पहिल्या स्थानी झेप घेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या दोघांमध्ये येत्या काही आठवड्यांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार, हे वेगळं सांगायची गरज नाही.
इंग्लंडचा फिल सॉल्ट तिसऱ्या स्थानी आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड याला फटका बसला आहे. दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे हेडची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.
तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्फोटक शतक ठोकणाऱ्या डेवाल्ड ब्रेव्हीस याने मोठी झेप घेतलीय. ब्रेव्हीस 80 वरुन थेट 21 व्या स्थानी पोहचला आहे. तसेच टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा दोघांव्यतिरिक्त टॉप 10 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचा समावेश आहे. सूर्या सहाव्या स्थानी आहे.