…अन् लोक अचानक होतात गायब, नव्या संकटाने पाकिस्तानमध्ये गोंधळ, नेमकं काय घडतंय? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 22, 2025

…अन् लोक अचानक होतात गायब, नव्या संकटाने पाकिस्तानमध्ये गोंधळ, नेमकं काय घडतंय?

…अन् लोक अचानक होतात गायब, नव्या संकटाने पाकिस्तानमध्ये गोंधळ, नेमकं काय घडतंय?

Pakistan News : पाकिस्तान हा असा देश आहे जिथे कधी काय होईल हे सांगता येत नाही. महागाईच्या संकटामुळे इथे अगोदरच लोकांपुढे अनेक संकटं निर्माण झालेली आहेत. दुसरीकडे शिक्षण, आरोग्याच्याही गंभीर समस्या आहेत. असे असतानाच आता या देशात नव्या संकटाने तोंड वर काढलं आहे. इथे बलुचिस्तान या प्रदेशात लोक गायब होत आहेत. या संकटामुळे आता पाकिस्तानची जगभरात नाचक्की होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या संकटावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे मोठे आव्हान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यापुढे निर्माण झाले आहे.

नेमके प्रकरण काय? बलुचिस्तानमध्ये काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार बलुचिस्तानमध्ये सध्या बेपत्ता होणाऱ्या लोकांचा मुद्दा गंभीर बनला आहे. बलुचिस्तानमध्ये मानवाधिकारांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानमधील वरिष्ठ राजकीय नेते जमीअत उलेमा ए इस्लामचे प्रमुख मौलाना फजल उर रहमान यांनीदेखील सार्वजनिकरित्या बलुचिस्तानमधील संरक्षक दलं लोकांना अवैध पद्धतीने गायब करत असल्याचे मान्य केले आहे. खैबर पख्तुनख्वाच्या एका सभेत त्यांनी बलुचिस्तानमधील युवक आणि कार्यकर्त्यांना बेकायदेशीररित्या गायब केले जात आहे. त्यांची कुटुंबे अजूनही न्यायाच्या शोधात आहेत. ही कुटुंबे आंदोलन करत आहेत, असे भाष्य केले आहे.

बलुचिस्तानमध्ये हजारो कुटुंबीय बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहेत. आमच्या कुटंबातील बेपत्ता झालेल्या सदस्यांचं काय झालं? ते कुठे आहेत? असे प्रश्न या कुटुंबीयांकडून उपस्थित केले जात आहेत. याच मुद्द्यावर आंतरराष्ट्री मानवाधिकार संघटनांनीही चिंता व्यक्त केली आहे. मात्र अद्याप यावर कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही.

मानवाधिकार संघटनांचे मत काय?

बलुचिस्तानमधील या समस्येवर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनीही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अमेरिकेतील मानवाधिकारांसाठी लढणारे वकील रीड ब्रॉडी यांनी जिनेव्हा प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या 7 व्या बलुचिस्तान आंतरराष्ट्रीय संम्मेलनात हा मुद्दा उपस्थित केला. बलुचिस्तानच्या व्यथेकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. त्या भागात होत असलेल्या अवैध हत्या, बेपत्ता होणारे लोक, महिला कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या या प्रकरणांची स्वतंत्र आणि निष्पक्ष तपासणी व्हायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता बलुचिस्तानमधील या गंभीर मुद्द्याची पाकिस्तान सरकार दखल घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.