
आशिया कप 2025 स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत पाकिस्तानने भारतासमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. खरं तर हे आव्हान आणखी कमी असतं. भारतीय खेळाडूंच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारताला अतिरिक्त धावांचा फटका बसला होता. अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव यांनी सोडलेल्या झेलमुळे भारताला 75 धावांचा भुर्दंड भरावा लागला होता. त्यात अभिषेक शर्माने साहिबजादा फरहानचा एक नाही दोन झेल सोडले. पहिला झेल सोडला तेव्हा त्याने खातंही खोललं नव्हतं. तर दुसरा झेल सोडला तेव्हा फुकटच्या सहा धावा गेल्या. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. साहिबजादा फरहान हा या सामन्यात 58 धावांची खेळी करून गेला. आता या धावा कोण भरून काढणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष होते. अभिषेक शर्माने व्याजासकट या धावा वसूल करून दिल्या. पहिल्या चेंडूपासून त्याने आक्रमण सुरु केलं. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आपला हेतू स्पष्ट केला.
अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध 24 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांसह अर्धशतक झळकावले. अभिषेक शर्मा टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध वेगाने अर्धशतकी खेळी करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम युवराज सिंगच्या नावावर होता. त्याने 29 चेंडूत ही कामगिरी केली होती. दोन्ही बाजूच्या संघांकडून अभिषेक शर्मा हा वेगाने अर्धशतकी करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. मोहम्मद हाफीजने 2012 मध्ये अहमदाबादमध्ये 23 चेंडूत भारताविरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं. अभिषेक शर्मा 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकार मारत 74 धावा करून बाद झाला.
अभिषेक शर्माने फक्त 331 चेंडूत आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये षटकारांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या एविन लुईसच्या नावावर होता. त्याने 366 चेंडूत 50 षटकार मारले होते. अभिषेक शर्माने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील 20व्या डावात 50 षटकारांचा टप्पा गाठला आहे. दुसरीकडे, अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी शतकी भागीदारी केली. आशिया कप 2025 मध्ये कोणत्याही संघासाठी कोणत्याही विकेटसाठी पहिली 100 हून अधिकची भागीदारी आहे. शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी पॉवर प्लेमध्ये 69 धावा केल्या होत्या.