देवेंद्र फडणवीसच माझे बाप, महादेव जानकर युतीसोबत आले नाही तरी… रत्नाकर गुट्टे मांडणार वेगळी चूल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 22, 2025

देवेंद्र फडणवीसच माझे बाप, महादेव जानकर युतीसोबत आले नाही तरी… रत्नाकर गुट्टे मांडणार वेगळी चूल

देवेंद्र फडणवीसच माझे बाप, महादेव जानकर युतीसोबत आले नाही तरी… रत्नाकर गुट्टे मांडणार वेगळी चूल

राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आपले पक्षप्रमुख महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षापासून राजकीयदृष्ट्या वेगळे होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी काळात रासप महायुतीपासून दूर झाल्यास, आपण मात्र भाजप-महायुतीसोबतच राहणार असल्याची ठाम भूमिका रत्नाकर गुट्टे यांनी जाहीर केली. त्यांच्या या वक्तव्यांमुळे परभणी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

रत्नाकर गुट्टे यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी रत्नाकर गुट्टे यांनी आपले नेते महादेव जानकर यांच्याबद्दल आदर व्यक्त करतानाच राजकीय भविष्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. महादेव जानकर हे माझे नेते आहेत, पण जर ते समजा युतीसोबत नाही आले तर मी निश्चित युतीसोबत राहीन. मी हे अनेकदा म्हणतो की माझ्या आई-वडिलांनी जन्म दिला असला तरी, राजकारणात जन्म देणारे देवेंद्र फडणवीस हे माझे बाप आहेत. त्यांचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य करावा लागेल आणि तो मी मान्य करेन,” असे विधान रत्नाकर गुट्टे यांनी केले.

मी जनतेला काहीतरी घेणं देणं लागतो

आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल मोठा निर्णय जाहीर केला आहे. रासप जर सोबत आले तर एकत्र लढू. त्यांनी जर मला एबी फॉर्म दिला तर मी लढेन. जर तो नाही दिला तर लढणार नाही, असे मत रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले आहे. मला सत्तेच्या विरोधात जाता येणार नाही. मला विकासाचं राजकारण करायचं आहे. मला जनतेसाठी राजकारण करायचं आहे. मला युतीच्या बाहेर जाता येणार नाही. मला युतीत राहावं लागेल. कारण मला जनतेने निवडून दिलं आहे. मी जनतेला काहीतरी घेणं देणं लागतो. मला त्यांचा विकास करायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

जे आघाडीसोबत येणार नाही त्यांच्या विना लढणार

माझं आणि धनंजय मुंडे यांची एक बैठक झाली आणि त्यात मी ही जागा सोडतोय अशी एक अफवा पसरवण्यात आली. मला या अफवेचे खंडन करायचं होतं. अशीच अफवा २०१४ मध्ये उठवून ते निवडून आले होते. मला या अफवेचे खंडन करायचं होतं. कारण ते सत्तेत असेल तरी विधानसभेला माझ्या विरोधात होते. त्यांचा माझा काही संबंधच नाही. त्यांनी माझ्याविरोधात बोलण्याला काही कारणच नाही. त्यांनी अफवा पसरवल्यामुळे मी तो व्हिडीओ केला. त्या व्हिडीओत मी इतकंच म्हटलं की मी आघाडीकडून लढणार. याचा अर्थ असाच की जे आघाडीकडून येतील त्यांना सोबत घेणार. जे आघाडीसोबत येणार नाही त्यांच्या विना लढणार, असा याचा अर्थ निघतो, असे रत्नाकर गुट्टे म्हणाले.