US Sanctions On Russia : पुतिन यांना बेईमान म्हटलं, अमेरिकेची रशियावर आतापर्यंतची सर्वात मोठी Action, अखेर ट्रम्पनी ते अस्त्र चालवलच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 23, 2025

US Sanctions On Russia : पुतिन यांना बेईमान म्हटलं, अमेरिकेची रशियावर आतापर्यंतची सर्वात मोठी Action, अखेर ट्रम्पनी ते अस्त्र चालवलच

US Sanctions On Russia : पुतिन यांना बेईमान म्हटलं, अमेरिकेची रशियावर आतापर्यंतची सर्वात मोठी Action, अखेर ट्रम्पनी ते अस्त्र चालवलच

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रशियावर प्रतिबंधांचा हल्ला केला आहे. ‘राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटतं की, व्लादीमीर पुतिन हे युक्रेन मुद्यावर प्रामाणिक नाहीत’, असं अमेरिकन अर्थ मंत्र्यानी बुधवारी म्हटलं. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने रशिया विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी प्रतिबंधांची कारवाई केली. एक प्रकारे ट्रम्प यांच्या अमेरिकी सरकारने रशिया विरुद्ध प्रतिबंधांची मोठी मालिकाच सुरु केली आहे. बुडापेस्ट येथील प्रस्तावित ट्रम्प-पुतिन शिखर सम्मेलन रद्द झाल्याच्या एकदिवसानंतर स्कॉट बेसेंट यांनी प्रतिबंधांची ही घोषणा केली. ‘मॉस्कोसोबत यु्द्धविराम चर्चेच्या प्रगतीवर अमेरिकी नेते निराश आहेत’, असं बेसेंट म्हणाले. “आम्ही आज दुपारनंतर किंवा उद्या सर्वातआधी रशिया विरोधातील प्रतिबंध वाढवू. रशियाविरोधात आमच्याकडून लावण्यात आलेल्या सर्वात मोठ्या प्रतिबंधांपैकी एक असेल” असं स्कॉट बेसेंट फॉक्स बिझनेसला दिलेल्या इंटरव्यूमध्ये म्हणाले.

युक्रेन चर्चेसाठी ट्रम्प गेल्या अनेक महिन्यांपासून रशियावर नवीन प्रतिबंध लावणं टाळत होते. निराशा असली, तरी रशियन राष्ट्राध्यक्षांना शांती करारासाठी तयार करु अशी ट्रम्प यांना आशा आहे. मागच्या गुरुवारी फोनवर पुतिन यांच्याशी बोलल्यानंतर ट्रम्प निराश दिसले.”आम्हाला अपेक्षा होती त्यानुसार, राष्ट्रपती पुतिन हे प्रामाणिकपणे आणि स्पष्टतेने चर्चेच्या टेबलावर येत नाहीयत” असं बेसेंट फॉक्स बिझनेसच्या मुलाखतीत म्हणाले. ऑगस्टमध्ये अलास्का येथे दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. त्याचवेळी त्यांना जाणीव झालेली की, गोष्टी पुढे सरकत नाहीयत असं बेसेंट यांचं म्हणणं आहे.

रशियावर कुठले नवीन प्रतिबंध लादणार?

हे नवीन प्रतिबंध रशियाच्या कोणत्या नव्या कंपन्यांवर आणि क्षेत्रांवर लावणार हे अमेरिकी अर्थ मंत्र्यांनी अजून स्पष्ट केलेलं नाही. जो पर्यंत औपचारिकरित्या या प्रतिबंधांची घोषणा होत नाही, तो पर्यंत ते या विषयी बोलू शकत नाहीत. त्याशिवाय युरोपियन संघाने सुद्धा बुधवारी जाहीर केलय की, ते रशियावर नवीन प्रतिबंध घालणार आहेत.यात 2027 पर्यंत रशियाकडून नैसर्गिक गॅस आयातीवर प्रतिबंध, मॉस्कोकडून वापरले जाणारे तेल टँकरना ब्लॅक लिस्ट करणं आणि रशिया राजनैतिक अधिकाऱ्यांच्या दौऱ्यावर प्रतिबंध अशा गोष्टींचा त्यामाध्ये समावेश आहे.

पण त्यांना ते जमत नाहीय

जानेवारी महिन्यात व्हाइट हाऊसमध्ये परतल्यापासून ट्रम्प यांनी वारंवार रशिया विरोधात प्रतिबंध लावण्याची धमकी दिली आहे. रशिया-युक्रेनमध्ये मागच्या साडेतीन वर्षांपासून युद्ध सुरु आहे. ट्रम्प यांना हे युद्ध थांबवण्याचं श्रेय हवं आहे. त्यासाठी ते बरेच प्रयत्न करत आहेत. पण त्यांना ते जमत नाहीय.