
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 फायनलसाठी आता अवघे काही तास बाकी आहेत. या महामुकाबल्यात चमचमत्या ट्रॉफीसाठी टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एकूण 6 वेळा आमनेसामने आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने या 6 पैकी शेवटच्या 3 सामन्यांमध्ये भारताला पराभूत केलं आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत अवघ्या काही दिवसांआधी टीम इंडियाला साखळी फेरीत पराभवाची धुळ चारली होती. मात्र असं असलं तरी अंतिम सामन्याचा दबाव हा वेगळा असतो. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघावर दबाव असणार हे मात्र निश्चित. दोन्ही संघांनी इथपर्यंत येण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीने माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस हरमनप्रीत भावूक झाली होती.
टीम इंडियाची या स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचण्याची यंदाची तिसरी वेळ आहे. भारताला याआधी 2005 आणि 2017 साली अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागलं होतं. भारताचा 2017 साली अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध अवघ्या 9 धावांनी पराभव झाला होता. हरमनप्रीत कौर 2017 साली अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघात होती. तर आता हरमनप्रीत कॅप्टन आहे. टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. हरमनप्रीतने या महामुकाबल्याआधी भाष्य केलं. हरमनप्रीत नक्की काय म्हणाली? हे आपण जाणून घेऊयात.
हरमनप्रीत काय म्हणाली?
“पराभूत झाल्यानंतर कसं वाटतं हे आम्हाला माहित आहे. मात्र यंदा आम्हाला विजयी झाल्यानंतर कसं वाटतं हे जाणून घ्यायचंय. आमच्यासाठी उद्याचा (2 नोव्हेंबर) दिवस खास असेल अशी आशा आहे. आम्ही फार मेहनत केली आहे. संपूर्ण टीमसाठी उद्याचा दिवस स्वत:ला झोकून देण्याचा आहे. हा माझ्यासाठी आणि संपूर्ण संघासाठी गौरवाचा क्षण आहे. गेल्या 2 सामन्यांमधील कामगिरीनंतर संपूर्ण देश आमच्यावर गर्व करतोय हे मला माहित आहे”, असं हरमनप्रीतने म्हटलं.
“टीम इंडिया सज्ज”
हरमनप्रीतने या महाअंतिम सामन्याआधी टीम इंडियाला खास मंत्र दिला आहे. “आपण वर्ल्ड कप फायनल खेळणं, यापेक्षा मोठी प्रेरणा नाही. टीम पूर्णपणे सज्ज आहे. खेळाडू एकमेकांना सपोर्ट करत आहेत. यातून संघातील एकीचं दर्शन होतं. तसेच आम्ही सामन्यानसाठी किती तयार आहोत, हे यातून सिद्ध होतं”, असंही हरमनप्रीत कौर हीने नमूद केलं.
दरम्यान दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील महाअंतिम सामना हा नवी मुबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.