
आयपीएल 2026 स्पर्धेच्या मिनी लिलावाची तारीख जवळ येत आहे. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मिनी लिलाव पार पडणार आहे. तत्पूर्वी खेळाडूंची ट्रेड विंडोच्या माध्यमातून खरेदी विक्री करता येणार आहे. दुसरीकडे, फ्रेंचायझींना राखून ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. असं असताना या मिनी लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबाद एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. रिलीज करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हेनरिक क्लासेनचं नाव असण्याची शक्यता आहे. मिनी-लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझी त्यांचा स्टार खेळाडू हेनरिक क्लासेनला रिलीज करेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. तर त्याला रिलीज करण्यामागे सनरायझर्स हैदराबादचं एक गणित असल्याचं बोललं जात आहे.
सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझी हेनरिक क्लासेनसाठी 23 कोटी रुपयांची किंमत मोजत आहे. त्यामुळे मिनी लिलावापूर्वी त्याला रिलीज केलं तर पर्समध्ये 23 कोटींची रक्कम जमा होईल. त्याचा फायदा त्यांना मिनी लिलावात चांगले खेळाडू घेण्यासाठी होऊ शकतो. हेनरिक क्लासेनसह काही 10 कोटींच्या किंमतीतील खेळाडूंना रिलीज केलं तर सनरायझर्स हैदराबादकडे 40 कोटींहून अधिक रक्कम असेल. त्यामुळे मिनी लिलावात हव्या असलेल्या खेळाडूसाठी चांगली बोली लावून घेता येईल.
दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने हेनरिक क्लासेनला परत खरेदी करण्याची योजना देखील आखल्याचं बोललं जात आहे. कारण इतर फ्रेंचायझी त्याला मोठी रक्कम देण्यास टाळाटाळ करतील. त्याचा फायदा सनरायझर्स हैदराबादला होऊ शकतो. सनरायझर्स हैदराबाद त्याला पुन्हा 15 ते 20 रुपये खर्च करून संघात घेऊ शकतात. सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने उर्वरित रकमेतून इतर स्टार खेळाडू खरेदी करण्याची योजना आखली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आयपीएल 2026 च्या मिनी-लिलावात हेनरिक क्लासेनचे नाव आलं तर आश्चर्य वाटायला नको.
सनरायझर्स हैदराबादर मोहम्मद शमी आणि हर्षल पटेल यांना रिलीज करू शकते. कारण मागच्या वर्षी मोहम्मद शमीच्या फिटनेसची समस्या होती. मात्र यंदा तो फिट असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. तर हर्षल पटेलने मागच्या पर्वातील 13 सामन्यात 16 विकेट घेतल्या. पण खूपच महागडा ठरला होता.