
पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम याने अखेर 2 वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. बाबर आणि त्याच्या चाहत्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकाची प्रतिक्षा होती. अखेर बाबरने 14 नोव्हेंबरला शतकाचा दुष्काळ संपवला. बाबरने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद शतक झळकावलं. बाबरने यासह पाकिस्तानला सलग दुसरा विजय मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. बाबरने नाबाद 102 धावा केल्या. बाबरच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेवर तब्बल 8 विकेट्सने मात केली. श्रीलंकेने पाकिस्तानसमोर 289 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानने हे आव्हान 10 बॉलआधी 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पाकिस्तानने 48.2 ओव्हरमध्ये विजयी धावा पूर्ण केल्या. पाकिस्तानने यासह मालिकाही जिंकली आहे. पाकिस्तानने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे.
पाकिस्तानला विजयी करण्यात बाबर व्यतिरिक्त सॅम अयुब, फखर झमान आणि मोहम्मद रिझवान या तिघांनी योगदान दिलं. फखर आणि रिझवानने अर्धशतक ठोकलं. पाकिस्तानसाठी फखर आणि सॅम या सलामी जोडीने 77 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सॅम अयुब 33 धावांवर आऊट झाला. त्यानंतर फखर आणि बाबरने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी 127 बॉलमध्ये 100 रन्सची पार्टनरशीप केली. फखर जमानच्या रुपात पाकिस्तानने दुसरी विकेट गमावली. फखरने 93 बॉलमध्ये 78 रन्स केल्या.
तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी
फखर आऊट झाल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि बाबर या अनुभवी जोडीने तिसर्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी करत पाकिस्तानला जिंकवलं. बाबर आणि रिझवानने 105 बॉलमध्ये 112 रन्सची पार्टनरशीप केली. रिझवानने 54 बॉलमध्ये 51 रन्स केल्या. तर बाबरने 119 बॉलमध्ये 8 फोरसह 102 रन्स केल्या. श्रीलंकेसाठी दुश्मंथा चमीरा याने 2 विकेट्स मिळवल्या.